AmravatiLatest News

राहाटगाव प्राणी निवारा केंद्रास आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा पाहणी दौरा; कामांना वेग देण्याचे दिले निर्देश अमरावती महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण उपक्रम — राहाटगाव प्राणी निवारा केंद्राच्या उभारणीस गती

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राहाटगाव येथे उभारण्यात येत असलेल्या प्राणी निवारा केंद्राच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज पाहणी दौरा केला. या केंद्राच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधीचा वापर करून राहाटगाव व कोंडेश्वर येथे प्राणी निवारा केंद्राची कामे जोरात सुरू असून येत्या ३ ते ४ महिन्यांत ही केंद्रे पूर्णत्वास येतील.
राहाटगाव येथील प्राणी निवारा केंद्रात सुमारे १०० मोकाट व अपघातग्रस्त श्वानांना थांबवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, या केंद्रात जखमी, हिंसक व आजारी श्वानांवर उपचार केले जातील. श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी “श्वान उत्पत्ती नियंत्रण उपक्रम”ही या केंद्रात राबविला जाणार आहे.

अमरावती महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे, जी अशा स्वरूपाचे प्राणी निवारा केंद्र उभारण्याच्या दिशेने पुढाकार घेत आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी याकरिता सर्व संबंधित विभागांना काम त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
हा उपक्रम शहरातील नागरिकांसाठी सुरक्षितता व स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
राहाटगाव प्राणी निवारा केंद्राच्या पाहणी दरम्यान महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले की, कामाच्या गतीला वेग द्यावा. प्राणी निवारा केंद्राचे बांधकाम येत्या ३ ते ४ महिन्यांत पूर्ण व्हावे यासाठी ठेकेदार व संबंधित अभियंत्यांनी वेळापत्रकानुसार काम पूर्ण करावे. प्रत्येक सुविधा गुणवत्तापूर्ण असावी. श्वानांसाठी निवास, उपचार, भोजन व शस्त्रक्रिया कक्ष यासह सर्व सुविधा दर्जेदार असाव्यात, याची खातरजमा करावी. श्वान उत्पत्ती नियंत्रण कार्यक्रम तातडीने सुरू करावा. शहरात मोकाट श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी या केंद्रात नियमित पद्धतीने शस्त्रक्रिया व देखरेख केली जावी. जखमी व हिंसक श्वानांवर त्वरित उपचाराची व्यवस्था ठेवावी. अपघातग्रस्त किंवा नागरिकांसाठी धोका ठरू शकणाऱ्या श्वानांवर तातडीने उपचार करून त्यांची काळजी घ्यावी. स्थायी देखभाल व्यवस्था तयार करावी. प्राणी निवारा केंद्र चालू झाल्यानंतर त्याची देखभाल, स्वच्छता व व्यवस्थापनासाठी आवश्यक कर्मचारी व साधनसामग्री निश्चित करावी. कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी शहर अभियंता यांनी आढावा घेऊन अडचणी दूर कराव्यात.
आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा उपक्रम अमरावती शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, याची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावीपणे व्हावी.
या पाहणी दौ-यात शहर अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, पशुशल्‍य चिकीत्‍सक डॉ.सचिन बोंद्रे, सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, उपअभियंता आशिष अवसरे, अभियंता राजेश आगरकर, आनंद जोशी, मनपा कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button