AmravatiLatest News

पाच दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप “सर्वांगीण व बहुशाखीय शिक्षण म्हणजे भावी समाजाच्या उभारणीसाठीची बौद्धिक मशागत” – डॉ. मोना चिमोटे

अमरावती : “सध्याच्या संकुचित विषयकेंद्रित शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक कुतूहल हरवत आहे. अशा काळात ‘सर्वसमावेशक आणि बहुशाखीय शिक्षण’ केवळ एक शैक्षणिक संकल्पना राहिलेली नसून, ती भावी समाजाच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक उभारणीसाठी आवश्यक असलेली बौद्धिक मशागत ठरते. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षा किंवा गुणांच्या चौकटीत विचार करता कामा नये. शिक्षण हे माणूस घडवणारे माध्यम असावे लागते. त्यासाठी मानवविज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि संस्कृती यांची समन्वयात्मक जाण आवश्यक आहे,” असे विचार विद्यापीठाच्या मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांनी व्यक्त केले. त्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) द्वारा प्रायोजित आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर मराठी विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वसमावेशक आणि बहुशाखीय शिक्षण’ या विषयावरील पाच दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपीय सत्राच्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “भारतीय शिक्षण परंपरेतून आपल्याला जे सश्रद्ध, सखोल, मूल्याधारित आणि समन्वयी ज्ञान मिळाले, त्याला आधुनिक संदर्भांतून तपासण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासात विचारस्वातंत्र्य, सृजनशीलता आणि आंतरशाखीय दृष्टिकोन यांचा अंतर्भाव झाला पाहिजे”.

समारोपीय सत्राचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ. माधव पुटवाड यांनी केले. त्यांनी सांगितले की, “शिक्षण हे समाजाला बदलविणारे आणि नव्या कल्पनांना जन्म देणारे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे विविध विषयांचा परस्परसंबंध अधोरेखित करणाऱ्या आणि संवादात्मक शिक्षणाच्या पद्धती स्वीकारणाऱ्या उपक्रमांची आज नितांत गरज आहे. कार्यशाळेतील विविध सत्रांमधून केवळ व्याख्याने न होता संवाद, विश्लेषणे, प्रात्यक्षिके आणि अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणली गेली, ही या कार्यशाळेची मोठी उपलब्धी आहे’’, असे त्यांनी नमूद केले.” समारोपीय सत्रात सहभागींपैकी डॉ. जयश्री बडगे, स्नेहा खडसे आणि स्नेहल चौधरी यांनी आपल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “या कार्यशाळेने आमच्यात नव्या कल्पना रुजविल्या. शैक्षणिक चौकटीतून बाहेर पडून विचार करण्याची प्रेरणा मिळाली.”

या पाच दिवसीय कार्यशाळेत ‘मिथकशास्त्र’, ‘मातृदेवता’, ‘शिक्षणप्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानाची उपयुक्तता’, ‘मानसशास्त्र आणि साहित्य सहसंबंध’, ‘भारताचा भौतिक विकास आणि श्रम संस्कृती’, ‘पाश्चात्य मिथकांतील आदिबंध आणि त्याचा आधुनिक साहित्यावरील प्रभाव’, ‘महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील बहुभाषिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या आणि उपाय’, ‘महाराष्ट्रातील लोककला आविष्कार’, ‘महानुभाव पंथ आणि मराठी साहित्य संस्कृती एक अनुबंध’, ‘वैज्ञानिक सत्य आणि ललित साहित्य’ या विषयांवर अनुक्रमे डॉ. अशोक राणा, स्नेहा टोम्पे, डॉ. सुहास पाचपांडे, डॉ. हेमंत खडके, डॉ. भगवान फाळके, प्रा. ज्ञानेश्वर गटकर, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, लोककलावंत विनय भगत, डॉ. अण्णा वैद्य व डॉ. मोना चिमोटे या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत कलाविष्कारांचाही समावेश होता. श्री.विनय भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या लोककला सादरीकरणांनी उपस्थितांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची प्रचिती आली. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन अभिजित इंगळे यांनी केले. यावेळी डॉ.प्रणव कोलते, यांच्यासह विविध विभागातील अंशदायी शिक्षक, संशोधक विद्यार्थी, विद्यापीठातील पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button