राज ठाकरे 6 वर्षांनी ‘मातोश्री’वर: उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचले. जवळपास सहा वर्षांनंतर राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ची पायरी चढल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या २२ दिवसांपूर्वीच हे दोन्ही ठाकरे बंधू २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते, आणि आता ही भेट मुंबईच्या राजकारणात नवे संकेत देत आहे.
आज सकाळी राज ठाकरे ‘मातोश्री’वर दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. ‘मातोश्री’च्या गेटवर संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरेंच्या स्वागतासाठी गेटपर्यंत आले आणि त्यांनी राज ठाकरेंना मिठी मारत आपले बंधुप्रेम दर्शवले. या भेटीची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
यापूर्वी, हिंदी सक्तीच्या विरोधात आयोजित ‘मराठी विजयी मेळाव्या’च्या निमित्ताने, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकत्र येत मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा संदेश दिला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी ‘मातोश्री’ला भेट दिल्याने ठाकरे बंधूंमधील सलोख्याचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. हे दोन्ही भाऊ भविष्यात एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातील का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.



