Latest NewsSangli

सरकारी देयके रखडल्याने टोकाचा निर्णय; सांगलीतील कंत्राटदाराची आत्महत्या

सांगली : राज्यात सरकारी कंत्राटदारांना वेळेवर देयके न मिळाल्याने वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर, सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तांदूळवाडी, जिल्हा सांगली येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

कंत्राटदार संघटनांनी आरोप केला आहे की, वेळेवर देयके न मिळाल्याने निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक अडचणी आणि त्यातून आलेल्या मानसिक ताणतणावामुळेच हर्षल पाटील यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. राज्य सरकारकडून होणारा कामांच्या देयकांचा सततचा विलंब, प्रलंबित असलेली बिले आणि त्यामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट हेच त्यांच्या आत्महत्येमागे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण कंत्राटदार समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या ढिसाळ धोरणांवर आणि कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणींकडे होत असलेल्या दुर्लक्षावर या घटनेमुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राज्य सरकारने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button