यवतमाळमध्ये सासरच्यांनीच सुनेला पैशांसाठी विकले

यवतमाळ : माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातून समोर आली आहे. पती आणि एका मुलाच्या आकस्मिक मृत्यूनंतर निराधार झालेल्या एका विधवेला तिच्या सासरच्या मंडळींनीच ₹1.20 लाखांना गुजरातमधील एका व्यक्तीला विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षांच्या शारीरिक शोषणातून पुत्रप्राप्ती झाल्यानंतर त्या महिलेला गावात सोडून दिले गेले, अशी हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. आर्णी पोलिसांच्या बेपत्ता व्यक्तींच्या शोध मोहिमेतून हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
पैशांसाठी विकले; दोन वर्षानंतर पुत्रप्राप्तीनंतर गावात सोडून पसार
आर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील या महिलेच्या पती आणि एका मुलाचा अकाली मृत्यू झाला होता. परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ती तिचा दुसरा मुलगा आणि मुलीसह सासरच्या लोकांकडे राहत होती. या निराधार महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, तिची नणंद आणि नणंदोई यांनी तिला रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवून मध्य प्रदेशात नेले. तेथून तिला ₹1,20,000 मध्ये गुजरात येथील पोपट चौसाने नावाच्या व्यक्तीला विकण्यात आले.
या व्यक्तीने तब्बल दोन वर्षे तिचे शारीरिक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे, तिच्यापासून पुत्रप्राप्ती झाल्यानंतर तिला पुन्हा तिच्या गावात आणून सोडून देण्यात आले.
पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
या प्रकरणी पोलिसांनी महिलेची सासू, सासूचा दुसरा नवरा, दीर, नणंद आणि नणंदोई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आर्णी पोलिसांच्या बेपत्ता शोध मोहिमेदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. 2023 मध्ये पीडित महिलेच्या आई-वडिलांनी त्यांची मुलगी आणि नातवंड बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. आर्णी पोलीस बेपत्ता महिलेचा शोध घेत असताना, त्यांना ही महिला तिच्या गावीच असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार पुढे आला.
पोलीस अधिकारी निलेश सुरडकर यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.
पीडित महिलेच्या मुला-मुलीचा अजूनही पत्ता नाही
या घटनेनंतरही पीडित महिलेच्या एका मुलगा आणि मुलीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. त्यांना शोधून काढण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे. पीडित महिलेने स्वतः बाईटमध्ये आपली व्यथा मांडली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात महिला विक्रीचे वाढते प्रकार
यवतमाळ जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या असहायतेचा व अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना परप्रांतात विक्री करण्याचे अनेक प्रकार यापूर्वीही घडले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना आखण्याची आणि मानवी तस्करीला आळा घालण्याची नितांत गरज असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
प्रतिनिधी : दुर्गेश कान्हु



