मनसर येथे वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त, मनसेकडून कारवाईचा इशारा
नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील मनसर येथील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. मनसर ते आमडी फाटा या ३ किलोमीटर अंतरादरम्यान कुठेही वळण नसल्यामुळे वाहनचालक चुकीच्या दिशेने दुहेरी (टू-वे) सर्व्हिस रोडवरून ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, रोडवर गॅरेज लाईनमुळे मोठी वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. याबाबत वारंवार पोलीस प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) रॉकी चवरे आणि इतर कार्यकर्त्यांनी २३ जुलै रोजी सकाळी रामटेकच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. योग्य कारवाई न झाल्यास मनसे आपल्या ‘स्टाईल’ने कारवाई करेल, असा इशारा या निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.
जिल्हा अध्यक्ष शेखर दूंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनसैनिक रॉकी चवरे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. यावेळी रामटेक तालुका अध्यक्ष मनोहर भगत, रामटेक विधानसभा सचिव सुरज दूंडे, मनसैनिक आशिष बोरीकर, विकी धुर्वे, सौरभ सावकार, हर्ष ढगे, रणजीत भिवगडे, शशांक मलाघारे, मंगेश माहुले यांच्यासह इतर मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



