‘सर्वसमावेशक आणि बहुशाखीय शिक्षण’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन-शिक्षणातून सर्जनशील, चिंतनशील नागरिक घडावेत-कुलगुरू डॉ. बारहाते

अमरावती – “शिक्षण ही केवळ परीक्षाभिमुख माहिती पुरवणारी प्रक्रिया राहू नये, तर ती विद्यार्थ्यांमध्ये मूल्यदृष्ट्या समृद्ध, चिंतनशील, सर्जनशील, नैतिकदृष्ट्या जागृत आणि सामाजिक बांधिलकी जपणारी शाश्वत प्रक्रिया असली पाहिजे,” असे मत कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी मांडले. ते ‘ आणि बहुशाखीय शिक्षण’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा मराठी विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा २१ ते २५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
पुढे बोलताना कुलगुरू डॉ. बारहाते यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या पार्श्वभूमीवर सध्याच्या शिक्षणपद्धतींचे आत्मपरीक्षण आवश्यक असल्याचे नमूद केले.“आजच्या शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये केवळ कौशल्येच नव्हे, तर सामाजिक भान, विवेक, आचारधर्म, नैतिकता आणि संवेदनशीलतेची जाणीवही निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांची विचारशक्ती, सर्जनशीलता आणि संवादक्षमता वाढविणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे या उपस्थित होत्या. त्यांनी “बहुशाखीय शिक्षणाच्या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमतांचा विकास होतो. आधुनिक काळात एका विशिष्ट शाखेपुरते शिक्षण मर्यादित न राहता विविध विषयांतील आकलन, एकात्मता आणि संवादातून अधिक प्रभावी व्यक्तिमत्त्व घडते”, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यशाळेचे समन्वयक डॉ. माधव पुटवाड यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका मांडताना सांगितले की, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ही भारताच्या ज्ञान परंपरेशी जोडलेली पुनर्रचना आहे. या धोरणाच्या आधारावर विद्यार्थी केंद्रित, बहुविध अनुभवांवर आधारित आणि समग्र विकास घडवणाऱ्या शिक्षण पद्धतीचा विचार या कार्यशाळेत होणार आहे.” या कार्यशाळेत विविध क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक, संशोधक, साहित्यिक, लोककलावंत मार्गदर्शन करणार असून यात डॉ. अशोक राणा, स्नेहा टोम्पे, डॉ. सुहास पाचपांडे, डॉ. हेमंत खडके, डॉ. भगवान फाळके, प्रा. ज्ञानेश्वर गटकर, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, लोककलावंत विनय भगत, डॉ. अण्णा वैद्य यांचा समावेश आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेतील सत्रे तंत्रज्ञानाचा वापर करत, चर्चात्मक व संवादात्मक पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. ‘मिथकशास्त्र’, ‘मातृदेवता’, ‘मानसशास्त्र आणि साहित्य: सहसंबंध’, ‘भारताचा भौतिक विकास आणि श्रमसंस्कृती’, ‘शिक्षणप्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानाची उपयुक्तता’, आदी विषयांवर सखोल विचारमंथन होणार आहे. सूत्रसंचालन अभिजित इंगळे यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. प्रणव कोलते यांनी केले. यावेळी ज्येष्ठ कवी डॉ. सुखदेव ढाणके, डॉ. हेमंत खडके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विविध विभागातील अंशदायी शिक्षक, संशोधक विद्यार्थी, विद्यापीठातील पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



