AmravatiLatest News

नांदगाव पेठ नाला वाद: शेतकऱ्यांचा न्याय मिळवण्यासाठी संघर्ष, माहितीच्या अधिकारातही नाही माहिती

अमरावती: नांदगाव पेठ नजीकच्या रामगाव वाळकी गावातील शेत सर्वे क्रमांक ६१ मधील नाल्याच्या एकत्रीकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी या प्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे शेतकरी डॉ. चंद्रशेखर गिरी यांनी माहितीच्या अधिकारात (RTI) विचारलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट झाले आहे. उपअधीक्षक नेमाडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

भूमी अभिलेख अधिनियमानुसार, शेतातील ‘पोट खराब’ असलेल्या भागाचे ‘अ’ आणि ‘ब’ गटात विभाजन केले जाते. रामगाव वाळकी येथील गोविंदा बिल्डर्सने ‘अ’ वर्गात येणारा नैसर्गिक नाला बुजवून त्यात भराव टाकून नाल्याला अरुंद संरक्षक भिंत बांधल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होऊन शेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या गंभीर प्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे तक्रार केली आहे. आता सर्वांचे लक्ष येत्या २७ तारखेला होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे, जिथे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आणि तहसीलदार लोखंडे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख आणि उपअधीक्षक यांनी शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली नसल्याने, आता माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवावी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून पारदर्शक आणि न्यायपूर्ण निर्णय घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

प्रतिनिधी : नितेश किल्लेदार

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button