कन्नड बस स्थानकातील स्वाती बाखडे यांचा मुलींसाठी ‘मोफत बस सेवा’ उपक्रम; मदतीसाठी तत्परतेचे आवाहन

कन्नड : कन्नड बस स्थानकाच्या आगार प्रमुख स्वाती बाखडे यांनी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी मुलींना मोफत बस सेवेचे आवाहन केले असून, प्रवासात कोणतीही अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधून मदत मिळवण्याचे आवाहनही केले आहे.
‘स्टेज डेअरिंग’ कार्यक्रम लवकरच
एका वृत्तपत्राशी संवाद साधताना स्वाती बाखडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठावर बोलण्याची संधी देण्यासाठी लवकरच बस आगार प्रमुख आणि सहायक आगार अधीक्षक यांच्या माध्यमातून ‘स्टेज डेअरिंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांशी थेट संवाद आणि समस्यांचे निराकरण
कन्नड बस स्थानकाच्या प्रमुख स्वाती बाखडे यांनी श्री संघर्ष पगारे यांच्यासोबत कन्नड येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेत आणि कॉलेजमध्ये बसने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना बससेवेबाबत काही अडचणी आहेत का, तसेच चालक व वाहकांचे सहकार्य मिळते का, याची त्यांनी तपासणी केली. विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी नवीन बस पास संदर्भातही विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली.
या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांना बससेवा योग्य प्रकारे मिळते का, अशी विचारणा करण्यात आली. तसेच, मुलींना काही अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. बस संदर्भात काही समस्या असल्यास बस स्थानकात माहिती कळवण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी वाहतूक सहायक अधीक्षक पगारे, वाहतूक निरीक्षक सागर पाटील, वाहतूक नियंत्रक गणेश खंडागळे, जगनाथ पांडव, चालक पी. एस. पढरे, वाहक विष्णू कांबळे, श्रीराम पवार आणि इतर कर्मचारी व वाहक उपस्थित होते.
विद्यार्थिनींचा सकारात्मक प्रतिसाद
या उपक्रमाविषयी विद्यार्थिनींनीही आपला अनुभव व्यक्त केला:
प्रतीक्षा अकोलकर: “आम्ही रोज शाळा-कॉलेजला येत असतो. आम्हाला एसटी पास मिळाला आहे आणि आम्हाला काही अडचण येत नाही. आमचा पास संपत असल्यास, वाहक लगेच सूचना करतात आणि आम्हाला सहकार्य करतात.”
वैष्णवी गायकवाड: “आम्हाला बसमध्ये कधीकधी अडचण येत असली तरी, चालक आणि वाहक नेहमी महिला व मुलींची बाजू घेतात. त्यामुळे एसटी डेपोचे सहकार्य नेहमी मिळते.”
आरती गायकवाड आणि स्नेहल गोलाईत: “आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थिनी असल्याने शाळा, कॉलेज आणि क्लासमध्ये ये-जा करताना अडचणी येतात. मात्र, बसमुळे आम्हाला सुरक्षित वाटते. सर्व मुलींना बस मोफत असल्याने शिक्षणात कोणतीही अडचण येत नाही.”
स्वाती बाखडे यांच्या या उपक्रमामुळे कन्नड परिसरातील ग्रामीण विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.



