AmravatiLatest News

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची इतवारा बाजार व टाऊन हॉल परिसराची पाहणी

अमरावती : शहरातील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था व नागरी सुविधा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज सकाळी ८ वाजता इतवारा बाजार व नेहरू मैदान येथील टाऊन हॉल परिसराची पाहणी केली.

स्वच्छता, वाहतूक व बाजार व्यवस्थापनावर भर
पाहणीदरम्यान आयुक्तांनी इतवारा बाजारातील रस्ते, पथदिवे, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा संकलन व स्वच्छतेबाबत सविस्तर आढावा घेतला. व्यापाऱ्यांनी यावेळी वाहतूक व स्वच्छतेसंदर्भातील अडचणी मांडल्या, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. प्रत्येक दुकानदाराने डस्टबिन बाळगणे बंधनकारक असून, अनधिकृत शेड, ताडपत्री, खोके यांचे त्वरित अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच बाजार परिसरात नियोजित पार्किंगची आवश्यकता अधोरेखित करत, पार्किंगसाठी जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. दुकानदारांच्या प्रतिनिधींशी बैठक घेवून नियोजनात्मक दृष्टिकोनातून सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. परिसरातील शौचालये तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

टाऊन हॉलच्या पुनरुत्थानाचा आढावा
नेहरू मैदानातील टाऊन हॉलचीही पाहणी करण्यात आली. सध्याची स्थिती, उपलब्ध सुविधा व भविष्यातील उपयुक्तता लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सादरीकरण सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

वाहतूक आणि अतिक्रमणाबाबत स्पष्ट निर्देश
रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास येताच, आयुक्तांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. नियोजित पार्किंग स्थळे स्पष्ट चिन्हांकित करून त्यांचा योग्य वापर सुनिश्चित करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमण त्वरित हटवण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले. पादचाऱ्यांना मोकळा रस्ता मिळावा आणि दुकानदारांनी रस्त्यावर मालसामान न ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

स्वच्छता जनजागृती आणि सहभाग वाढवण्याचे आवाहन
बाजार परिसरात नियमित स्वच्छता, वेळेवर कचरा संकलन व घनकचरा व्यवस्थापन यासाठी जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलिसांशी समन्वय ठेवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

नागरिकांना आयुक्तांचे आवाहन
“शहराच्या स्वच्छतेसाठी, वाहतूक शिस्तीसाठी आणि सार्वजनिक सुविधांच्या योग्य वापरासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. ‘स्वच्छ, सुंदर आणि सुटसुटीत अमरावती’ या ध्येयासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करायला हवे,” असे आवाहन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावेळी केले.

या पाहणीवेळी शहर अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भूषण पुसतकर, पशुचिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक खडेकार, उपअभियंता सुहास चव्हाण, प्रमोद इंगोले, आशिष अवसरे, उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, अतिक्रमण पथकप्रमुख योगेश कोल्हे, अभियंता जयंत काळमेघ, लक्ष्मण पावडे, आनंद जोशी, वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू डिक्याव, विजय बुरे आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button