अमरावती महानगरपालिका अंतर्गत ‘मिशन फुटपाथ फ्रीडम’ अंतर्गत अतिक्रमणावर मोठी कारवाई
अमरावती :अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार ‘मिशन फुटपाथ फ्रीडम’ अभियानांतर्गत झोन क्रमांक ३ दस्तुरनगर अंतर्गत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सकाळी ११:३० वाजता सुरू करण्यात आली. एस.आर.पी.एफ. कॅम्प रोड वडाळी गार्डनपासून ते चपराशीपुरा येथील मोठी मस्जिद, अब्राज हॉटेल, जजिरा हॉटेल व सुंदरलाल चौकापर्यंतच्या परिसरात फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर ही मोहीम राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान चहा कॅन्टीन, मटन व मास विक्रीची दुकाने, लोखंडी खोके तसेच फुटपाथवर वाढवलेले शेड व ओटे हटविण्यात आले. त्यामुळे या परिसरातील पादचाऱ्यांना आता मोकळा व सुरक्षित मार्ग मिळणार आहे.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, निरीक्षक श्री शाहेबान यांच्यासह पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला होता. अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.



