सोनारखेडा येथे पूर्णा नदीपात्रातून वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई; ट्रॅक्टर जप्त

भातकुली : भातकुली तालुक्यातील सोनारखेडा येथील पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्यांवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. तहसीलदार डॉ. अजित कुमार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (22 जुलै) मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागाच्या भरारी पथकाला पाहताच वाळू माफियांनी नदीपात्रातून पळ काढला. मात्र, महसूल पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करत वाळूने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडला.
जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी खोलापूर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला आहे. जुबेर खान उस्मान खान, रा. धामोरी, ता. भातकुली असे ट्रॅक्टर मालकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कलम 333 (35) भा. न्याय संहिता प्रवरण अधिनियमांतर्गत, तसेच 1966 कलम 9, 15 खान खनीज अधिनियम 1958, 3, 421, सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम 3 व 7 आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार डॉ. अजित कुमार येळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी संतोष सिंग गिल, मनोज बेले, संदीप निरगुळे, किरण काकड, कोतवाल वैभव चहाकार, पोलीस पाटील मातकर हे या कारवाईत सहभागी होते. अवैधरीत्या गौण खनिजावर आळा घालण्यासाठी खोलापूर परिसरात धाडसत्र सुरूच राहणार असल्याचे तहसीलदार येळे यांनी सांगितले.



