AmravatiLatest News

लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे नागरी वस्‍ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर कामांची आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांच्‍याद्वारे पाहणी

अमरावती : अमरावती महानगरपालिकेअंतर्गत शेगाव प्रभाग क्र. १ येथील लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे नागरी वस्‍ती सुधार योजने अंतर्गत सन २०२३-२०२४ मध्ये झोन क्र. १ मध्‍ये मंजूर झालेल्या विविध विकास कामांची आज दिनांक २२/०७/२०२५ रोजी आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
या योजनेअंतर्गत संबंधित भागात रस्ते मजबुतीकरण, नाली बांधकाम, पाणीपुरवठा व अन्य नागरी सुविधा सुधारण्यासाठी विविध कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन आयुक्तांनी दर्जा, गती व कामाच्या प्रगतीबाबत माहिती घेतली. संबंधित अभियंत्यांना गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी निर्देश दिले की, कामाचा दर्जा अबाधित ठेवावा. सर्व मंजूर विकासकामे उच्च दर्जाची असावीत. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये. निर्धारित वेळेत काम पूर्ण करा. कामे निश्चित वेळापत्रकानुसार पूर्ण होणे आवश्यक आहे. कोणतीही अनावश्यक विलंब सहन केला जाणार नाही. स्थळावर नियमित देखरेख ठेवावी. संबंधित अभियंत्यांनी कामाची नियमित पाहणी करून अडचणी तातडीने सोडवाव्यात. नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर प्रतिसाद द्यावा. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर त्वरीत कारवाई करावी व त्यांना समाधानकारक सेवा मिळावी. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवावी. सर्व विकासकामे पारदर्शक व जबाबदारीने पार पाडावी, याची दक्षता घ्यावी. कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करावी. कामाच्या गुणवत्तेसाठी संबंधित कंत्राटदार जबाबदार राहतील. निकृष्ट काम केल्यास कठोर कारवाई केली जाईल. नागरी वस्त्यांमध्ये स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे. “नागरिकांच्या सहभागातूनच शाश्वत विकास शक्य आहे,” असे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
नागरिकांनी आयुक्तांसमोर त्यांच्या काही अडचणी मांडल्या असता, त्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेमधून नागरी वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे हा उद्देश असून, महानगरपालिका नागरिकांच्या सहकार्याने ही उद्दिष्टे प्रभावीपणे पूर्ण करीत आहे.

पाहणी दरम्यान शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, उपअभियंता आशिष अवसरे, जयंत काळमेघ, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक राजु डिक्‍याव, महानगरपालिकेचे अभियंते व संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button