AmravatiLatest News

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अमरावती तुरूंगात असलेल्या 4 जणांची सुटका

11 जुलै 2006 रोजी मुंबईला हादरवून सोडणाऱ्या लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. या निर्णयामुळे तब्बल 20 वर्षांनंतर हे आरोपी कारागृहातून बाहेर पडले आहेत.

या बॉम्बस्फोटात 189 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 800 हून अधिक जण जखमी झाले होते. 11 मिनिटांच्या आत झालेल्या सात स्फोटांनी संपूर्ण मुंबई हादरली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेले 12 आरोपी पुणे, नागपूर आणि अमरावती येथील वेगवेगळ्या कारागृहांत शिक्षा भोगत होते.

अमरावती कारागृहातील आरोपींची प्रतिक्रिया:

अमरावती मध्यवर्ती कारागृहात असलेले चार आरोपी रात्री उशिरा सुटले आणि मुंबईकडे रवाना झाले. यातील एक आरोपी, सोहेल मोहम्मद शेख, यांनी कारागृहातून बाहेर पडताच माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.

“20 वर्षांनंतर आज आम्ही जेलमधून सुटलो. देवावर आणि न्यायालयावर आमचा विश्वास आहे. या प्रकरणाशी आमचा काही संबंध नव्हता. आम्ही चार जण या अमरावती जेलमध्ये होतो. 2006 च्या प्रकरणात आम्हाला अटक करण्यात आली होती आणि आता सरकारकडे आमची कोणतीच मागणी नाही,” असे सोहेल मोहम्मद शेख यांनी सांगितले.

या निर्णयामुळे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरोपींना दिलासा मिळाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button