भारतीय ज्ञानप्रणाली या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप – शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी देणारा दृष्टिकोन हवा आहे: डॉ. मनीषा कोडापे

अमरावती : “शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी देणारा दृष्टिकोन हवा आहे. केवळ पाश्चिमात्य शिक्षणपद्धतीचे अंधानुकरण न करता भारतीय ज्ञान परंपरेतील उज्ज्वल आणि उन्नत दृष्टिकोन समकालीन शिक्षणात समाविष्ट करणे काळाची गरज आहे,” असे मत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य प्रा.डॉ. मनीषा कोडापे यांनी व्यक्त केले. त्या ‘ज्ञानाचे पुनरुज्जीवन : समकालीन शिक्षणात भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावरील पाच दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना बोलत होत्या.
दिनांक १४ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (घ्ग्-छच्ण्ॠ) अंतर्गत ही राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत दररोज सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत विविध सत्रांद्वारे भारतीय ज्ञान परंपरेचा समकालीन शिक्षणात उपयोग, त्याचे महत्त्व व उपयोजन यावर सखोल विचारमंथन झाले. कार्यशाळेत आचार्य श्रेयस कुऱ्हेकर, डॉ. संदीप वाघुळे, डॉ. स्वानंद पुंड, डॉ. प्रणव कोलते, डॉ. अविनाश मोहरील, डॉ. श्वेता बडगुजर, डॉ. नितीन फिरके, डॉ. वर्षा नाठार, डॉ. राहुल लोधा, डॉ. रवींद्र मुंद्रे, डॉ. मनीषा कोडापे यांसारख्या विषयतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
सत्रांमध्ये भारतीय तत्त्वज्ञान, पर्यावरणदृष्टी, आरोग्य परंपरा, नीतिशास्त्र, लोकपरंपरा, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, बुद्ध तत्त्वज्ञानातील विचारप्रवाह, धातूशास्त्र, आणि शैक्षणिक मूल्ये या विषयांवर व्याख्यान, संवाद, चर्चा आणि कार्यशाळात्मक उपक्रम राबविण्यात आले. प्रास्ताविक कार्यशाळेचे सहसमन्वयक डॉ. प्रणवकोलते यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या उद्दिष्टांची माहिती देत सांगितले की, "भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास हा केवळ ऐतिहासिक दस्तऐवजांपुरता मर्यादित नसून, ती एक सजीव, अनुभवाधारित आणि सर्वस्पर्शी ज्ञानसंस्कृती आहे." कार्यशाळेत सहभागींच्या वतीने डॉ. चंदन विश्वकर्मा, कृष्णा, उज्ज्वला गुल्हाने, राजेश डोंगरे यांनी आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त करत कार्यशाळेचे शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. ही कार्यशाळा भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास आधुनिक शिक्षणात प्रभावीपणे कसा समाविष्ट करता येईल यावर प्रकाश टाकणारी ठरली. विचारप्रवृत्त करणारे संवाद आणि आंतरक्रियात्मक सत्रांमुळे सहभागी शिक्षक व अभ्यासकांना एक वैचारिक दिशा प्राप्त झाली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अभिजित इंगळे यांनी केले. डॉ. माधव पुटवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारोप सत्रास विद्यापीठातील विविध विभागांतील अंशदायी शिक्षक, संशोधक विद्यार्थी व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



