AmravatiLatest News

करवसुली वाढीसाठी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची महत्त्वपूर्ण बैठक

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२ जुलै २०२५ रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये करवसुली विभागाच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मालमत्ता कर वसुली अधिक प्रभावी व गतिमान करण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यात आले.

कर भरण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी आयुक्तांनी तातडीने विविध उपाययोजना राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, प्रलंबित थकबाकीदारांकडून कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
“महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी करवसुली हा मुख्य आधार आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी जबाबदारीने व काटेकोरपणे काम करावे. नागरिकांमध्ये करप्रणालीबाबत जनजागृती वाढवावी आणि सुलभ सेवा द्यावी,” असे स्पष्ट निर्देश आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावेळी दिले.

बैठकीत खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:

  • ई-पेमेंट सुविधेचा प्रचार व प्रोत्साहन
  • थकीत करदात्यांना नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया गतीमान करणे
  • मोठ्या थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई सुरू करणे
  • शहरभर जनजागृती मोहीम राबवणे
  • समाजमाध्यमांचा प्रभावी वापर
  • कर वसुली प्रक्रियेत तांत्रिक पारदर्शकता व सुलभता वाढवणे
  • २ व ३ ऑगस्ट रोजी मालमत्ता कर शिबिरांचे आयोजन

आयुक्तांनी सर्व वसुली लिपिकांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या की, वसुलीच्या कामात कुठलीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही. आवश्यकतेनुसार कठोर कार्यवाही केली जाईल. तसेच, सहाय्यक संचालक नगर रचना विभागांना जास्तीत जास्त मालमत्ता रेगुलराइज करण्यासाठी कारवाई तातडीने सुरू करण्यास सांगण्यात आले असून या अनुषंगाने मोठ्या थकबाकीदारांची तपासणी देखील करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

नागरिकांना आवाहन करतांना आयुक्त म्हणाल्या, “महानगरपालिकेच्या सेवा सुरळीत चालवण्यासाठी वेळेवर कर भरणे गरजेचे आहे. आपला थोडासा सहभाग आपल्या शहरात मोठा बदल घडवू शकतो.”

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक संचालक नगर रचना घनश्याम वाघाडे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, नितीन बोबडे, धनंजय शिंदे यांच्यासह सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी व मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button