जिल्ह्यातील घरकुलांना मोफत टीपी वाटपाला वेग

अमरावती : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील घरकुलांना पाच ब्रास वाळू वाटपाला वेग आला आहे. आतापर्यंत साडेनऊ हजार ब्रास वाळूचे वितरण 7 हजार 710 लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. वाळू वितरणाची प्रक्रिया वेगात सुरू झाल्याने घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरणाची प्रक्रिया वेगात सुरू असून विविध पाच टप्प्यात वाळूचे वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 54 हजार 949 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 7 हजार 710 लाभार्थ्यांना 9 हजार 427 ब्रास वाळूचा पुरवठा करण्यात आला आहे.
जिल्ह्यात घरकुलांच्या बांधकामासाठी एकूण 2 लाख 15 हजार 14 ब्रास वाळूची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये स्थानिक वापरासाठी 165 वाळू गट राखीव ठेवण्यात आले आहे. त्यातून 54 हजार 918 ब्रास वाळूसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, एकही वाळू गट अद्यापही लिलावात विकल्या गेलेला नाही, त्यामुळे हा संपूर्ण साठा घरकुल लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
तालुकानिहाय वाळू वाटपाचा तपशील (लाभार्थी संख्या आणि वाटप झालेली वाळू ब्रासमध्ये) अमरावती-15 लाभार्थी, 75 ब्रास, तिवसा- 31, लाभार्थी, 121 ब्रास, भातकुली- 751 लाभार्थी, 759 ब्रास, चांदूर रेल्वे- 306 लाभार्थी, 355 ब्रास, नांदगाव खंडेश्वर- 399 लाभार्थी, 430 ब्रास, धामणगाव रेल्वे- 208 लाभार्थी, 241 ब्रास, मोर्शी- 458 लाभार्थी, 458 ब्रास, वरुड- 479 लाभार्थी, 490 ब्रास, दर्यापूर- 265 लाभार्थी, 628 ब्रास, अंजनगावसुर्जी- 350 लाभार्थी, 350 ब्रास, अचलपूर- 2 हजार 731 लाभार्थी, 2 हजार 991 ब्रास, चांदूरबाजार-217 लाभार्थी, 1 हजार 29 ब्रास, धारणी- 1 हजार 500 लाभार्थी, 1 हजार 500 ब्रास, चिखलदरा-0 लाभार्थी, 0 ब्रास.



