स्वामी विवेकानंद बगीचा, खावू गल्ली व अग्निशमन उपकेंद्राची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्याकडून पाहणी
अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज प्रशांत नगर, कार्यशाळा विभाग परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्वामी विवेकानंद बगीचा, नव्याने उभारण्यात येणारी खावू गल्ली, तसेच अग्निशमन उपकेंद्र यासह इतर नागरी सुविधा कामांची माहिती घेतली.
स्वामी विवेकानंद बगीच्याच्या सौंदर्यीकरण कामांचा आढावा घेतांना आयुक्तांनी झाडांची संख्या वाढवणे, वॉकिंग ट्रॅक सुधारणे व खुल्या जागांचा अधिक प्रभावी वापर करण्याबाबत सूचना दिल्या.
नवीन निर्मितीच्या टप्प्यात असलेल्या खावू गल्लीत स्वच्छता, सुव्यवस्था आणि स्टॉल्सचे नियोजनबद्ध व्यवस्थापन याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या. स्थानिकांना उपजीविकेची संधी मिळावी आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरावे या हेतूने ही खावू गल्ली विकसित केली जात आहे.
त्याचबरोबर अग्निशमन उपकेंद्राचीही पाहणी करतांना, आयुक्तांनी स्थानिक आपत्कालीन सेवा अधिक मजबूत करण्यावर भर दिला. तांत्रिक सुविधा, कर्मचारी संख्या आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा सक्षम ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणी दौऱ्यात वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, मुख्य अग्निशमन प्रमुख लक्ष्मण पावडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दिपक खडेकार, उद्यान अधिक्षक अजय विंचुरकर, उपअभियंता प्रमोद इंगोले, मंगेश कडू, स्वप्निल जसवंते, माजी नगरसेवक, मनपा कर्मचारी व स्थानिक नागरिकही उपस्थित होते.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी विकासकामांमध्ये गती आणण्यासाठी नियमित निरीक्षणाचे निर्देश देत, नागरिकांच्या सहभागातून अधिक कार्यक्षम प्रशासनाची ग्वाही दिली.
प्रशांतनगर परिसरात आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.



