भारतीय ज्ञानप्रणाली या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

अमरावती : भारतीय ज्ञान परंपरेमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म आणि मूल्यशिक्षण यांचा सुंदर समन्वय आढळतो. आज आधुनिक शिक्षण व्यवस्थेत केवळ माहितीचा साठा वाढवला जात आहे; पण मूल्याधारित ज्ञानाच्या अभावामुळे सामाजिक आणि बौद्धिक दृष्टीने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय ज्ञान परंपरेचे पुनरुज्जीवन ही आजच्या काळातील अत्यंत आवश्यक गोष्ट आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी केले.
संत गाडगे बाबा अमरावती प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) पुरस्कृत विद्यापीठाचा पदव्युत्तर मराठी विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ते १८ जुलै दरम्यान आयोजित ‘ज्ञानाचे पुनरुज्जीवन: समकालीन शिक्षणात भारतीय ज्ञानप्रणाली’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “भारतीय परंपरेतील शिक्षण हे माणूस घडवणारे शिक्षण होते. आजच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी तयार करण्यात येते. पण भारतीय ज्ञान परंपरेतून केवळ ज्ञानी नव्हे तर विवेकी, जबाबदार आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व घडविले जात होते. ही परंपरा पुन्हा समकालीन शिक्षणात समाविष्ट केली पाहिजे.”
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आचार्य श्रेयस कुऱ्हेकर यांनीही भारतीय ज्ञान परंपरेचे समकालीन समाजातील स्थान विशद केले. “भारतीय ज्ञान ही केवळ परंपरा नव्हे, ती अनुभव, प्रयोग आणि सखोल निरीक्षणातून विकसित झालेली विचारपद्धती आहे.भारतीय शिक्षणव्यवस्थेचा गाभा ‘गुरुकुल’ होता. तेथे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर जीवनशैली, आचारधर्म, समाजाचे भान आणि निसर्गाशी एकरूपता शिकवली जात होती. आज शिक्षण मूल्यविहीन झाले आहे, ते पुन्हा मूल्याधिष्ठित करणे हे आपले कर्तव्य आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख व कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. मोना चिमोटे यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद करत सांगितले की, “भारतीय ज्ञान परंपरा ही अमूल्य ठेवा असून, आधुनिक शिक्षणात ती समाविष्ट करण्यासाठी नव्या दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. या कार्यशाळेचा उद्देश केवळ तात्त्विक चर्चा नसून, प्रत्यक्ष कृतियोग्य दिशादर्शक आखणे हा आहे.”
दि. १४ ते १८ जुलै २०२५ दरम्यान ही राष्ट्रीय कार्यशाळा विद्यापीठ परिसरात पार पडणार आहे. दररोज सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत विविध सत्रांमध्ये आचार्य श्रेयस कुऱ्हेकर, डॉ. संदीप वाघुळे, डॉ. स्वानंद पुंड, डॉ. प्रणव कोलते, डॉ. अविनाश मोहरील, डॉ. श्वेता बडगुजर, डॉ. नितीन फिरके, डॉ. वर्षा नाठार, डॉ. राहुल लोधा, डॉ. रवींद्र मुंद्रे, डॉ. मनीषा कोडापे या विषयतज्ज्ञांचे व्याख्यान, संवाद, चर्चा आणि कार्यशाळात्मक उपक्रम होणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित इंगळे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. प्रणव कोलते यांनी केले. यावेळी डॉ.माधव पुटवाड, यांच्यासह विविध विभागातील अंशदायी शिक्षक, संशोधक विद्यार्थी, विद्यापीठातील पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



