अंबादेवी परिसराची पाहणी – स्वच्छतेसाठी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे सक्त निर्देश
अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज अंबादेवी, एकविरा देवी व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या परिसरांची पाहणी केली. परिसरातील वाढत्या गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक आणि स्वच्छतेच्या समस्या लक्षात घेऊन त्यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी ससनर आणि बांधकाम विभागांना नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. अतिक्रमण विभागाला वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वाहतूक विभागालाही यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे स्पष्ट केले.
या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने सर्व समावेशक आराखड्याची आवश्यकता आहे. अंबादेवी संस्थान, एकविरा देवी संस्थान आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांनी मनपाशी समन्वय साधून हा परिसर नियोजनबद्ध पद्धतीने विकसित होण्यासाठी एकत्रित बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयुक्तांनी अंबानाला पुलावरील रिक्त जागेचा पार्किंगसाठी उपयोग कसा करता येईल याबाबतही सविस्तर चर्चा केली. अंबानाला स्वच्छ करण्यात आला असला तरी सध्या मोठ्या प्रमाणात कचरा, निर्माल्य, कपडे व इतर वस्तू नाल्यात टाकल्या जात असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर नाल्यांची स्वच्छता जे.सी.पी. मशीनद्वारे सुरू असून, नाल्यातील गाळ त्वरित उचलण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले की, नाल्यात कचरा टाकू नये. तसे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारापासून इतरांनाही परावृत्त करावे.
जिथे मोठ्या यंत्रसामग्रीची पोहोच शक्य नाही, अशा ठिकाणी लहान यंत्रसामग्री किंवा मनुष्यबळाच्या सहाय्याने स्वच्छता करावी, तसेच नाल्यांमध्ये पाणी साचू नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.
या पाहणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक खडेकार, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, उपअभियंते प्रमोद इंगोले, लक्ष्मण पावडे, हेमंत महाजन, अतिक्रमण पथकप्रमुख योगेश कोल्हे, जेष्ठ आरोग्य निरीक्षक विजय बुरे, स्वास्थ निरीक्षक धनिराम कलोसे, रोहीत हडाले, प्रितम रामटेके, मनिष हिरोडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



