Latest NewsMaharashtra

ठाकरे बंधू एकत्र आल्यावर आनंदी झालेल्यांसाठी महत्त्वाची बातमी, युतीबाबत राज म्हणतायेत…

नाशिक : शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठीच्या मुद्द्यावर वरळी येथे एकत्र मेळावा झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत या दोन पक्षांची एकी होणार का, याबाबत चर्चा रंगल्या असतानाच युतीबाबतच्या निर्णयाची नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत वाट बघा, असे सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी सोमवारी केले. त्यामुळे युतीबाबतची अनिश्चितता कायम आहे.

इगतपुरी येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला सुरुवात झाली आहे. या वेळी राज यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधत, राज्यातील विविध विषयांवर मत मांडले. या वेळी ठाकरे बंधू एकत्र येणार का, या प्रश्नावर त्यांनी वर्षअखेरपर्यंत निर्णय अपेक्षित असल्याचे उत्तर दिले. ‘त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात हिंदीची सक्ती आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून कोणतेही राजकारण न करता आम्ही एका चौकटीत लढा दिला आणि विजयी झालो. एखाद्या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घाईगडबडीत होत नाही. त्यासाठी एक प्रक्रिया असते,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘गुजरात किंवा अन्य कुठेही हिंदी व तिसऱ्या भाषेची सक्ती नाही. मग महाराष्ट्रात का? मराठीची ताकद सरकारला समजली,’ असेही त्यांनी सांगितले.

भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशांबाबत राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. ‘विधानसभेत बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करायला गेलो होतो. त्यावेळेस असलेले आमदार नेमके कोणत्या पक्षात हेच कळले नाही,’ असे ते म्हणाले. ‘सध्या राज्यात यापेक्षाही भीषण परिस्थिती दिसत असून, मतदारही गोंधळले आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

त्रिभाषा सूत्रावर उद्धव यांची पाठराखण
त्रिभाषा सूत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारल्याचा दावा राजा ठाकरे यांनी फेटाळला. ‘त्रिभाषा सूत्राबाबत केंद्राकडून अहवाल आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी समिती नियुक्त करून हा विषय बाजूला ठेवला होता. मात्र, महायुती सरकारने त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सुरू केली’, असे सांगत राज यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button