हिंदी सक्ती आणि गुप्त अर्ज: महाराष्ट्रातील ‘त्या’ शाळेची चर्चा

मुंबई : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्ती असेल, मराठी ही दुसरी भाषा म्हणूनच शिकवली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे सांगत असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती खूप वेगळी आहे. आता साकीनाका येथील एका कॉन्व्हेंट शाळेत चक्क तिसऱ्या इयत्तेपासून हिंदी शिकवण्यासाठी चाचपणी केली जात आहे. पालकांना आपल्या पाल्याला हिंदी भाषा शिकवायची आहे, अथवा नाही, याबाबतचे मत पालकांकडून एका अर्जावर नोंदवून घेतले जात आहे. हा हिंदी सक्ती लादण्याचाच प्रकार आहे, असे मत आता प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा नको, या मागणीसाठी संघर्ष करणारे भाषातज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राबद्दलचे शासन निर्णय रद्द करत या विषयाच्या अभ्यासासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. मात्र असे असूनही साकीनाका येथील सेंट मेरीज् मलंकारा हायस्कूल या शाळेत पालकांसमोर एक अर्ज देण्यात आला. या अर्जात राज्य सरकारच्या ३० जून २०२५च्या शासन निर्णयाचा दाखला देण्यात आला आहे. या शासन निर्णयात इयत्ता सहावीपासून हिंदी भाषा अधिकृतपणे सुरू करण्याचे म्हटले आहे. पण या शाळेच्या मते इयत्ता तिसरीपासूनच हिंदी भाषा शिकवण्यास सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य वाढणार आहे.
या अर्जात नमूद केल्याप्रमाणे इंग्रजी आणि मराठीप्रमाणे हिंदी हा विषय नियमित विषय म्हणून शिकवला जाणार असून दर आठवड्याला हिंदीच्या चार तासिका होणार आहेत. मूलभूत गोष्टींचा समावेश, कथाकथन, व्याकरण असे स्वरूप असणार आहे. मात्र या अर्जानुसार हा उपक्रम भाषा सुधारण्यासाठी असून तो पूर्णपणे ऐच्छिक आहे. पण त्यासाठी पालकांना मत द्यायचे आहे. पालकांना ‘माझ्या मुलाला हिंदी विषय शिकवण्यास संमती देतो’ किंवा ‘मी संमती देत नाही, माझे मूल मानक अभ्यासक्रमातच राहील’ असे दोन पर्याय दिले आहेत. त्यापैकी एका पर्यायाची निवड करत पालकांना आपल्या पाल्याचे भवितव्य ठरवायचे आहे.



