AmravatiLatest News

आज संजय खोडके नी विधानपरिषदेत मंडले तेच प्रश्न, अमरावती गुन्हाची राजधानी

मुंबई : अमरावती शहरात गेल्या आठवड्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची निर्दयीपणे हत्या झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. अमरावतीत अवैध धंद्यांना उधाण आल्याने ‘माफियांचे शहर’ अशी ओळख निर्माण झाल्याची गंभीर बाब आमदार संजय खोडके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अमरावतीची कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी शहरात स्वतः लक्ष घालून सुरक्षा व पोलीस विभाग सक्षम करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही आ. खोडके यांनी केली.

वाढीव पोलीस स्टेशन आणि गुन्हेगारीचा आलेख
गृह विभागावरील पुरवणी मागणीवर चर्चा करताना आ. संजय खोडके यांनी अमरावती पोलीस विभाग अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाची स्थापना होऊन जवळपास २५ वर्षे झाली आहेत आणि सध्या १० पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. मात्र, शहराचा झपाट्याने विस्तार झाल्याने लोकसंख्येच्या दृष्टीने नवीन पोलीस स्टेशनची नितांत गरज आहे.

शहराच्या आयुक्तालयाच्या हद्दीत नवीन दोन पोलीस स्टेशन वाढवण्याची आवश्यकता असून, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, यावर अद्याप निर्णय न झाल्याने शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढतच आहे. यामुळे, “शहरात नवीन पोलीस स्टेशन स्थापन करण्याचा प्रस्ताव कधी मान्य करणार?” असा थेट प्रश्न आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत विचारला.

अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात
आ. खोडके यांनी सांगितले की, शहरात एमडी ड्रग्जची सर्रास विक्री होत असून, सराईत गुन्हेगार त्यात सहभागी आहेत. पोलिसांचे भय राहिले नसल्याने ते बिनधास्तपणे गुटखा, गांजा, अवैध दारूचा व्यवसाय करत आहेत. अवैध धंदे वाढल्याने मारामारी, हाणामारी आणि त्याचे पर्यावसान हत्येच्या घटनांमध्ये होत आहे.

“गतकाळात अनेक खुनी घटना घडल्या, आता तर कायद्याचा धाकच राहिला नाही. अमरावतीत एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली. ही अत्यंत चिंतेची बाब असून अमरावतीमध्ये कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे,” असे ते म्हणाले. हे असेच सुरू राहिल्यास अमरावतीमध्ये ‘माफिया राज’ येईल, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अमरावतीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

वाहतूक व्यवस्था आणि सीसीटीव्हीचा अभाव
शहरात गल्लोगल्ली चक्री जुगार, सट्टा आणि क्रिकेट बेटिंगसारखे प्रकार वाढले असून, झटपट पैसे कमवण्याच्या नादात युवा पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे. वाढत्या चोरीच्या घटनाही चिंतेची बाब असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात चोख बंदोबस्त आणि नियमित पेट्रोलिंग वाढवण्याबाबत उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी सभागृहाला केली.

अमरावती शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत मागील पाच वर्षांपासून गृह विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात प्रस्ताव मंजूर करून कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली. शहराचा विस्तार होत असल्याने वाहतूक वाढली आहे, मात्र वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी पोलीस विभागाचे दंड वसुलीकडे जास्त लक्ष लागले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शहराच्या उड्डाणपुलावर एका महिलेला ट्रकने चिरडल्याची नुकतीच घडलेली घटना लक्षात घेता, अनियंत्रित वाहतुकीला लगाम घालण्याची गरज असून, यासाठी शहरात उत्तमरित्या ट्रॅफिकची व्यवस्था करण्यात यावी, असेही ते म्हणाले.

पोलीस वसाहतींची कमतरता
पोलीस कल्याणच्या दृष्टीने पोलिसांच्या नवीन वसाहती निर्माण करण्याची गरज आहे. काही पोलीस वसाहती निर्माण होत असल्या तरी, अधिकाधिक पोलिसांची घरे निर्माण करण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचनाही आ. संजय खोडके यांनी शासनाच्या गृह विभागाचे लक्ष वेधून केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button