महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केली उत्तर झोनमधील विविध परिसराची पाहणी
अमरावती : अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी उत्तर झोनमधील क्रीडा संकुल, खेळाचे मैदान, व्यावसायिक संकुल प्रकल्प व स्वच्छता स्थितीची पाहणी केली. दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता नवसारी सर्वे क्र. २९ येथील क्रीडा संकुल, खेळाचे मैदान, व्यावसायिक संकुल, नवसारी स्मशानभूमी कचरा स्पॉट, एकविरा विद्युत कॉलनी, रिंगरोडवरील आराधना स्पॉट आणि रहाटगाव रोड परिसर या ठिकाणी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
नवसारी सर्वे क्र. २९ येथे उभारण्यात येत असलेल्या खेळाचे मैदान, क्रीडा संकुल आणि व्यावसायिक संकुलाच्या प्रगतीचा आढावा घेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या प्रकल्पाच्या माध्यमातून कोणताही महापालिकेचा निधी न वापरता, ‘बांधा-वापरा-हस्तांतरण’ या तत्वावर प्रकल्प उभारण्यात येत असून, परिसरातील नागरिकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
हा प्रकल्प १६,७०८ चौ. मी. क्षेत्रफळावर उभारण्यात येत असून यात ५२.७० X ९२.५० मीटरचे फुटबॉल मैदान, बास्केटबॉल व बॅडमिंटन कोर्ट, प्रशासकीय इमारत, कॅफेटेरिया, क्लब हाऊस व व्यावसायिक संकुल यांचा समावेश आहे.
या पाहणीदरम्यान आयुक्तांनी नवसारी स्मशानभूमी परिसर, एकविरा कॉलनी, रिंगरोडवरील आराधना स्पॉट व रहाटगाव रोड या ठिकाणी स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी त्यांनी घनकचरा व्यवस्थापन, डस्टबिन वापर, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य व्यवस्थापन यावर विशेष भर दिला.
आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले की, ज्या ठिकाणी डस्टबिन नाही किंवा कचरा टाकण्यास मनाई असूनही कचरा टाकला जात आहे, अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच, नागरिकांनी देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत दिनांक १ ते ३१ जुलैदरम्यान “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” हे विशेष अभियान राबवण्यात येत असून, स्वच्छ आणि सुंदर अमरावतीसाठी नागरिकांनी एकत्र येणे अत्यावश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहाय्यक संचालक नगर रचना घनश्याम वाघाडे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, दीपक खडेकार,उपअभियंता आशिष अवसरे, स्वास्थ अधीक्षक श्रीकांत डवरे, अभियंता आनंद जोशी व मनपाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



