इर्विन ते राजकमल पुलावर भीषण अपघात, महिला ठार
अमरावती : शहराच्या मध्यवर्ती भागातील इर्विन ते राजकमल उड्डाणपुलावर आज दुपारी घडलेला अपघात एक गंभीर प्रश्न उपस्थित करतो – आपल्या आपत्कालीन व्यवस्था वेळेत पोहोचतात का?
सिटी न्यूज कार्यालयासमोर, MH 27 C 9008 क्रमांकाच्या दुचाकीवरून निघालेल्या वर्षा काळंगे (वय ५२, राहणार अर्जुन नगर, शिवाजी नगर) या महिलेला, MH 27 BX 7459 क्रमांकाच्या भारत गॅस पेट्रोल टँकरने चिरडले.
या भीषण अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आणि रस्त्यावर तडफडत पडल्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदतीसाठी पुढे येण्याऐवजी मोबाईलवर फोटो आणि व्हिडीओ घेणे पसंत केले.
- दिरंगाईचा मृत्यूशी संबंध?
ऍम्ब्युलन्सला यायला २० मिनिटे उशीर. - ट्राफिक पोलीस १५ मिनिटांनी पोहोचले.
- स्थानिक पोलीस स्टेशन अवघ्या ५ मिनिटांवर असूनही, पोलीस ३० मिनिटांनी दाखल.
या सगळ्या विलंबामुळेच वर्षा काळंगे यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
साक्षीदार म्हणतात…
“घटना घडल्यानंतर सगळे पाहत राहिले. कुणी काही केलं नाही. अशा वेळी प्रशासनही वेळेत पोहोचत नसेल तर लोकांनी तरी धावून यायला हवं होतं.”
प्रशासनाला सवाल
हा अपघात केवळ वाहनचालकाच्या चुकीमुळे झाला, असे म्हणणे अपुरे ठरेल. आपत्कालीन सेवांच्या दिरंगाईने एका निरपराध महिलेचा जीव गेला.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडूनही यंत्रणा वेळेवर पोहोचत नसतील, तर “सामान्य माणूस सुरक्षित आहे का?” हा खरा प्रश्न समोर येतो.
शहरात वाढत्या अपघाताच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनचालकांच्या जबाबदारीबरोबरच प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसाद यंत्रणांचं सुधारण्याची नितांत गरज आहे.



