AmravatiLatest News

महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची ईटीसी केंद्र, दवाखाने व शाळेची पाहणी

अमरावती : महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी बुधवार, दिनांक ०२ जुलै २०२५ रोजी ईटीसी सेवा व सुविधा केंद्र (भौतिक उपचार केंद्र), आयसोलेशन दवाखाना, अंबिका नगर दवाखाना आणि महानगरपालिकेच्या शाळेला अचानक भेट देत तपासणी केली.
ईटीसी केंद्राच्या पाहणीत आयुक्तांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. केंद्रातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. संबंधित अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या उपक्रमासाठी सजग राहावे, आणि केंद्र सर्व सुविधा युक्त असावे यासाठी प्रयत्नशील राहावे, असे निर्देश देत निधी महानगरपालिका आणि शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आयुक्तांनी अंबिका नगर व आयसोलेशन दवाखान्याच्या नियोजनाचीही पाहणी केली. यावेळी स्वच्छता, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, उपलब्ध औषधे, रुग्णांसाठी असलेल्या सुविधा, इमारतीचे स्वरूप आदी बाबींवर सखोल चर्चा झाली. दवाखाने चोख व कार्यक्षम राहण्यासाठी आरोग्य सेवांमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, यावर भर देत आयुक्तांनी स्पष्ट सूचना दिल्या.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी महानगरपालिकेच्या शाळेचीही पाहणी केली. शाळेतील प्राथमिक वर्ग, शिक्षक संख्येची माहिती, विद्यार्थ्यांची संख्या, शाळेतील भौतिक सुविधा यांची माहिती घेतली. शिक्षकांशी संवाद साधताना, त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून, त्यांची प्रगती ही शिक्षकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शाळेतील क्रीडांगण, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, शैक्षणिक साहित्य, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा यासंदर्भातही सविस्तर पाहणी झाली. शाळेच्या गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आणि या कामासाठी निधी दिला जाईल, असे सांगितले.

या दौर्‍यात उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, डॉ. देवेंद्र गुल्हाणे, डॉ. अश्विनी खडसे तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button