बडनेरा येथील 55 वर्षीय इसमाचा योगी धाम लेआउटमधील नाल्यात मृतदेह आढळला;

बडनेरा : बडनेरा नवी वस्ती परिसरातील योगी धाम या खुल्या लेआउटमधील नाल्यामध्ये आज (2 जुलै) सकाळच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव राजू वानखडे (वय अंदाजे 55 वर्षे) असे असल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह तातडीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे पोलिसांनी याला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
स्थानीय नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती परिसरातीलच असून नेहमीप्रमाणे योगी धाम परिसरात फिरत असायचा. मात्र आज सकाळी त्याचा मृतदेह नाल्यामध्ये पडलेला आढळून आल्याने नागरिकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली.
CITY NEWS या वृत्तसंस्थेने संपर्क साधला असता, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, या घटनेने योगी धाम परिसरात शोककळा पसरली आहे.



