नांदेडच्या मालेगावमध्ये शेतकऱ्यांचा महामार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन!

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत चक्काजाम आंदोलन छेडले आहे. नांदेड-वसमत महामार्ग पूर्णतः ठप्प करण्यात आला असून, महिला, वृद्ध, लेकराबाळांसह शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.
रस्त्यावरच न्यायाची लढाई सुरु करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, पोलिस प्रशासनही घटनास्थळी पोहचले आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यभर रोष
शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित रचनेमुळे हजारो एकर शेतीचा बळी जाणार असल्याच्या भीतीने शेतकरी आंदोलक झाले आहेत. कोल्हापूरपासून ते नांदेडपर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये शेतकरी याला तीव्र विरोध दर्शवत आहेत.
शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांची प्रतिक्रिया –
“शक्तीपीठ महामार्गाला पर्यायी मार्ग आहेत. कोल्हापूरच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की, आम्ही आमच्या जिल्ह्यात हा रस्ता होऊ देणार नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी आता रस्ता वळवण्याचा डाव टाकला आहे. नांदेडच्या जनतेने सरकारमधील लोकांच्या घरावर मोर्चा काढावा. जर प्रत्येक जिल्ह्याने ही भूमिका घेतली, तर हा रस्ता आपोआप बंद पडेल.”
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर निशाणा –
रघुनाथदादा पाटलांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवरही टीकेची तोफ डागली.
“अशोक चव्हाण यांचे पोट शेतात नाही. त्यांच्या घराण्याने मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांनी आदर्श घोटाळा करून आपला आदर्श जगासमोर ठेवलाय. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष देणे चुकीचं ठरेल.”



