वणी बेलखेड्यात शेतकरी आक्रमक: जनावरांच्या चोऱ्यांविरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू!

चांदूरबाजार : चांदूरबाजार तालुक्यातील वणी (बेलखेडा) गावातील शेतकरी पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे आक्रमक झाले असून, २७ जूनपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वणी (बेलखेडा) गावात जनावरांच्या चोरीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गावातील तब्बल २१ शेतकऱ्यांचे ८५ जनावरे चोरीला गेल्याचे समोर आले असून, यामध्ये बैलजोड्या, गाई, म्हशी, बकऱ्या, शेळ्या आणि शेतीसाहित्याचा समावेश आहे. या चोरीमुळे हजारो ते लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलिसांचा निष्क्रियपणा: आंदोलकांचा आरोप
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ब्राह्मणवाडा थडी पोलिस स्टेशनला वारंवार तक्रारी देऊनही पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. १ मे २०२५ रोजी मुकेश अलोणे यांच्या गोठ्यातून ८ बकऱ्या चोरीला गेल्या असून, त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती, तरीही कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.
खासदारांचा हस्तक्षेपही निष्प्रभ
या प्रकरणात शेतकऱ्यांनी खा. अनिल बोंडे यांच्याकडे धाव घेतली होती. त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्यानंतरही कोणतीही चौकशी झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
आंदोलनाचा तिसरा दिवस, शेतकऱ्यांची भूमिका ठाम
वणी (बेलखेडा) गावातील मुकेश अलोने, आशिष पाटील, मुकेश पाटील, गुणवंत अलोने यांच्यासह इतर नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला असून अन्नत्याग सुरू केला आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास याच ठिकाणी आमचा जीव गेला तरी आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.”
प्रशासनाकडून केवळ आश्वासन
घटनास्थळी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासनांचीच भाषा वापरली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे आणि चोऱ्यांचे सत्र सुरूच राहिल्याने भविष्यात आणखी गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



