धामणगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे अपघातात अज्ञात युवकाचा मृत्यू

धामणगाव रेल्वे : धामणगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात रेल्वे अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 27 जून 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
प्राथमिक माहितीनुसार, मृत युवकाचे वय अंदाजे 25 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. त्याचा मृतदेह गौरक्षण परिसरात रेल्वे रूळांवर पडलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व दत्तापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला.
मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही, मात्र त्याच्या उजव्या हातावर टॅटू गोंदलेले असून, खिशामध्ये मोटरसायकलची चावी सापडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू असून मृताची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पोलिस प्रशासनाकडून कोणत्याही व्यक्तीने सदर युवकाला ओळखत असल्यास, तात्काळ दत्तापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



