दिवसा घरफोडी करणारे दोघं गजाआड, 1.37 लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला : अकोल्यातील खदान पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास करत खामगाव येथून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे खदानसह जुनेशहर व तेल्हारा परिसरातील काही घरफोडींचाही पर्दाफाश झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, २ जानेवारी २०२५ रोजी रेखा विजय घोडे यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी नमूद केलं की, नोकरीसाठी बाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख रुपये रोख रक्कम आणि १० ग्रॅम सोन्याचा गोफ असा एकूण ₹१,४५,००० किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.
तपासाअंती खामगाव येथील आकाश पवार आणि उमेश पवार या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी फक्त खदानच नव्हे, तर जुनेशहर आणि तेल्हारा हद्दीतही दिवसा घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्या मुसक्या आवळताच पोलिसांनी त्यांच्याकडून १५ ग्रॅम सोनं आणि २० ग्रॅम चांदी, असा एकूण ₹१,३७,००० चा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक गोपाल जाधव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे इतर पोलीस कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली.
पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी घर बंद करताना सुरक्षा यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित कराव्यात, शेजारधाऱ्यांना सूचित करावं आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.



