चांदूर रेल्वे आगाराची एसटी बस निंबाच्या झाडावर आदळली, ७ जण जखमी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे आगारातून बेलोरा गावाकडे जाणारी एसटी बस शुक्रवारी रात्री भीषण अपघाताला सामोरी गेली. ही घटना चिंधादेवी फाट्याजवळ रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. बस अचानक अनियंत्रित होऊन रस्त्यालगत असलेल्या निंबाच्या झाडावर आदळल्याने एकच खळबळ उडाली.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार या अपघातात बस चालक, वाहक आणि अन्य पाच प्रवासी अशा एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी चांदूर रेल्वे येथून अमरावती शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. बसमधील इतर काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघाताचे कारण समोर आले असून, बस समोर अचानक एक रोही (वन्य प्राणी) आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस झाडावर आदळली, अशी चर्चा घटनास्थळी सुरू आहे. अपघातानंतर काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत रस्त्यावरील अडथळा दूर केला.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. या अपघातामुळे एसटीच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अपघातस्थळी उपस्थित नागरिकांचे म्हणणे:
“बसने जोराची धडक दिल्याने मोठा आवाज झाला. आम्ही धावत आलो, तेव्हा काही प्रवासी आत अडकलेले होते. त्यांना बाहेर काढून लगेच अॅम्ब्युलन्सला फोन केला,” असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
पोलिस व एसटी विभागाकडून पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल.



