Amaravti GraminLatest News

अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

अचलपूर : अचलपूर तालुक्यातील खोजनपूर गावात कर्जबाजारीपणाच्या मानसिक तणावाखाली असलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रवीण बाबाराव धुळधळ (वय ४६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, २७ जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

प्रवीण यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती असून, त्यातील दीड एकर शेती त्यांच्या नावावर होती. गेल्या पाच वर्षांपासून सततची नापिकी, मालाला मिळणारा अत्यल्प भाव आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. देणेकऱ्यांच्या मागण्या, कर्ज फेडण्याची असमर्थता आणि त्यातून निर्माण झालेलं नैराश्य यामुळे प्रवीण यांनी अखेर टोकाचं पाऊल उचललं.

सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांनी गावाशेजारी असलेल्या आपल्या वडिलांच्या शेतातील झाडाला दोर लावून गळफास घेतला. काही शेतकऱ्यांना ही बाब लक्षात येताच गावात खबर दिली गेली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील संजय बुरंगे यांनी सरमसपूरा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

गावात मनमिळाऊ व प्रामाणिक स्वभावाने ओळखले जाणारे प्रवीण यांचा असा आकस्मिक मृत्यू झाल्याने संपूर्ण खोजनपूर गाव शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आई-वडील आणि मोठा आप्त परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिनिधि : नितेश किलेदार

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button