“माहूर-किनवटमध्ये दमदार पावसाची हजेरी; रखडलेल्या पेरण्या सुरू, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण”

नांदेड : माहूर व किनवट तालुक्यातील वाई बाजार, लखमापुर, मुरली, टाकळी, लांजी, सारखणी, रुई, हडसणी, वानोळा आदी गावांमध्ये २५ जून रोजी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही अनेक भागांत पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. विशेषतः काही भागात खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. मात्र २५ जून रोजी झालेल्या दमदार पावसामुळे रखडलेल्या पेरण्या सुरू झाल्या असून, शेती कामांना गती मिळाली आहे.
या पावसामुळे सुकण्याच्या मार्गावर असलेल्या उगम पिकांनाही नवसंजीवनी मिळाली असून, शेतकऱ्यांमध्ये नवीन आशा आणि उत्साह निर्माण झाला आहे.
स्थानिक शेतकरी दयाराम पाटील म्हणाले,
“गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होतो. पण काल झालेल्या पावसाने आम्हाला मोठा दिलासा दिला आहे. आता वेळ वाया न घालवता शेतात पेरण्या सुरू केल्या आहेत.”
सध्या तरी ढगाळ वातावरण टिकून असून, पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेती हंगाम सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.



