AmravatiLatest News

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनवले फेक अकाऊंट; ६५ हजारांची फसवणूक, अखेर गुन्हा दाखल

अमरावती : अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावाने बनवलेल्या फेक फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून एका ४७ वर्षीय गृहस्थाची तब्बल ६५ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २२ ते २३ जून दरम्यान घडली असून, २५ जून रोजी चांदूरबाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर भामटा म्हणाला – “मी जिल्हाधिकारी आहे, मित्राचे फर्निचर विकायचे आहे!”
चांदूरबाजार तालुक्यातील एका गावात राहणारे सुनील (वय ४७) यांच्या अल्पवयीन मुलाच्या मोबाईलवर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्या फेक प्रोफाईलवर जिल्हाधिकाऱ्यांचा कुटुंबीयांसह फोटोही होता. सुनील यांच्या पत्नी महसूल खात्यात कार्यरत असल्याने त्यांनी खात्री मानून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली.

त्यानंतर संबंधित फेक अकाऊंटवरून मेसेज आला की, “नागपूर येथून बदली झालेल्या मित्राचे फर्निचर विकायचे आहे. घेण्यास इच्छुक असाल, तर संपर्क करा.” पुढे दिलेल्या मोबाईल क्रमांकावर सुनील यांनी कॉल केला असता, समोरून ८५ हजार रुपयांचे फर्निचर असल्याचे सांगण्यात आले. वाटाघाटीनंतर तो व्यवहार ६५ हजारांत ठरवण्यात आला.

पैसे घेतल्यावर आणखी ३२ हजारांची मागणी, संशय बळावला
सुनील यांनी ऑनलाईन ६५ हजार रुपये भरल्यानंतर, फर्निचर डिलिव्हरीसाठी अतिरिक्त ३२ हजार रुपये मागण्यात आले. यावर सुनील यांनी आक्षेप घेतला असता सायबर भामट्याने मोबाईल बंद केला. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यापूर्वीही महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक
ही पहिली वेळ नाही. याआधी अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रविण आष्टीकर यांच्या फोटोचा वापर करून सिस्टिम मॅनेजरची १ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

पोलिसांकडून गुन्हा दाखल; सायबर क्राइमचा तपास सुरू
या प्रकरणी चांदूरबाजार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्या आरोपीने वापरलेला मोबाईल क्रमांक, व्यवहाराचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स, सोशल मिडिया अकाउंटचा तपास करण्यात येत आहे.

प्रतिनिधी : नितेश किलेदार

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button