२७ टन तांदळाची अमरावतीत लूट! ट्रकचालकाला डोळ्याला पट्टी बांधून चार तास फिरवले – पोलिसांची धडक कारवाई

अमरावती : अमरावती रिंगरोडवरील सेलिब्रेशन हॉलजवळ २२ जून २०२५ रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे. जळगाव येथील ट्रक चालक निजामुद्दीन मोहम्मद सईद (वय ५४) यांच्यावर चार अज्ञात इसमांनी हल्ला करून त्यांच्या ट्रकमधील २७ टन तांदूळ (सुमारे ७ लाख रुपये किंमत) लंपास केला. विशेष म्हणजे आरोपींनी ट्रकचालकाच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याला जबरदस्तीने दुसऱ्या वाहनात बसवून चार तास फिरवले, आणि त्यानंतर निर्जनस्थळी सोडून दिले.
या घटनेची नोंद नांदगावपेठ पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २१५/२०२५ अंतर्गत करण्यात आली असून, गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली.
तपासात लागली यशाची सोनेरी किनार
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखा, युनिट क्र. ०१ च्या पथकाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. ट्रकचालकाची सखोल चौकशी, सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस तपास पुढे सरकला.
त्यातून पोलिसांना लालखडी परिसरात संशयित ट्रक उतरवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती खात्रीशीर असल्याचे समजताच पोलिसांनी शिताफीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने यशस्वी कारवाई
ही धडक कारवाई पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
- पोलीस आयुक्त – अरविंद चावरीया
- उपायुक्त (मुख्यालय) – कल्पना बारवकार
- उपायुक्त (परिमंडळ १) – सागर पाटील
- सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) – शिवाजी बचाटे
- सहाय्यक पोलीस आयुक्त (फेजरपुरा विभाग) – कैलाश फुंडकर
तपासपथकात पो.नि. गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे आणि गुन्हे शाखा युनिट क्र. ०१ चे अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली.



