अमरावती SRP कॅम्पमध्ये बिबट्याचा वावर, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या घराबाहेर बिबट्याचा मुक्त संचार

अमरावती : अमरावती शहरालगत असलेल्या SRP कॅम्प परिसरात बिबट्याचा वावर असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चांदूर रेल्वे मार्गावरील पोहरा जंगल परिसर हा बिबट्यांच्या अस्तित्वासाठी ओळखला जातोच, मात्र आता हे वन्यप्राणी चक्क शहराच्या सीमेलगतच्या वसाहतीत पोहोचल्याचे समोर आले आहे.
कॅम्पमधील इमारतींमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या घरांच्या समोरच बिबट्याचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे. अंधारात बिनधास्तपणे वावर करत हा बिबट्या परिसरात संचार करत असल्याचे दृश्यमान झाले आहे.
बिबट्याचा मुक्त वावर — नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे SRP कॅम्प परिसरात कार्यरत पोलीस कर्मचारी, त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलं, महिलांची सुरक्षितता ही एक गंभीर बाब बनली आहे. बिबट्याने नागरिकांमध्ये रात्रीचे बाहेर पडणे धोकादायक केले आहे.
पोहरा जंगलाजवळ वाढलेला बिबट्याचा वावर चिंतेचा विषय
या घटनेमुळे वनविभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शहरी सीमेपर्यंत आलेल्या बिबट्याला पुन्हा जंगलात परत पाठवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.



