Latest News

उद्योगस्नेही वातावरणातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर : राज्यात अधिकाधिक गुंतवणूक यावी यासाठी उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्याचे शासनाचे धोरण आहे. उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध प्रशासकीय विभागांनी समन्वय ठेऊन एकत्रित प्रयत्न करावेत, उद्योगस्नेही वातावरणातून छत्रपती संभाजीनगर महानगरासह मराठवाडयाच्या विकासाला चालना मिळेल,यासाठी सर्व मिळून मिशन मोडवर काम करूया, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

ऑरिक सिटी येथे शेंद्रा-बीडकीन उद्योग वसाहतीत येणाऱ्या उद्योगांच्या अडचणीबाबत विभागीय आयुक्त पापळकर यांनी आज उद्योजकांशी संवाद साधत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, डीएमआयसी सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. भामरे, औद्योगिक विकास एमआयडीसीचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, व्यवस्थापक महेश पाटील, उपविभागीय प्रांत अधिकारी व्यंकट राठोड, पैठणच्या उपविभागीय प्रांत अधिकारी निलम बाफना यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले, मराठवाड्यात अधिकाधिक गुंतवणूक वाढावी, यादृष्टीने उद्योगांना आवश्यक ते सहकार्य तसेच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने उद्योजक व प्रशासन यामध्ये संवाद महत्त्वाचा आहे. उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने संवाद साधण्यात येईल. बैठकीत उद्योजकांनी मांडलेल्या अडचणींवर संबंधित विभागांनी विहित कालमर्यादेत कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे रस्त्यांवरील वाहतूक सुलभ व्हावी, यादृष्टीने नियोजन करावे, तसेच वाहतुकीच्या अनुषंगाने तात्काळ करण्यासारख्या उपाययोजना हाती घेऊन उद्योगांना वाहतूक कोंडीपासून दिलासा द्यावा, विभागात उद्योग उभारणी, त्यांच्या पायाभूत सुविधांच्या अडचणी, याबाबत सातत्याने उद्योगांशी संवाद साधण्यासाठी प्रशासन कायम उपलब्ध आहे, असेही विभागीय आयुक्त पापळकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शेंद्रा-बीडकीन येथील उद्योजकांच्या प्रशासकीय प्रलंबित विषयाबाबत दोन दिवसीय शिबिर घेत त्या सोडविण्यात येतील. छत्रपती संभाजीनगर उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासोबतच उद्योग वाढीसाठी प्रशासन उद्योजकांसोबत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी मासिआ या उद्योजक संघटनेचे प्रतिनिधीही आपल्या अडचणी मांडल्या. उद्योजकांनी मांडलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन आपल्या सोबत आहे, उद्योगांच्या वाढीला चालना देण्यात मासिआची भूमिकाही महत्त्वाची असेल, असेही विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले.

ऑरिक सिटी येथील नियंत्रण कक्षाची विभागीय आयुक्तांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. व्यवस्थापक महेश पाटील यांनी या कक्षाबाबत माहिती दिली.

यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, उद्योजक तसेच उद्योजक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button