खासदार बलवंत वानखडे यांनी केली शेतात नांगरणी

अमरावती : सात जूनपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्राच्या आगमनाने शेतकरी पुन्हा एकदा शेतात उतरले आहेत. शेतीची नांगरणी व पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून, याच पार्श्वभूमीवर अमरावतीचे खासदार बलवंत वानखडे यांनी थेट शेतात जाऊन नांगरणी करत शेतकऱ्यांच्या कामात हातभार लावला.
एका गावभेटीच्या दरम्यान खासदार वानखडे आपल्या वाहनातून उतरले आणि जवळच नांगरणी करत असलेल्या शेतकऱ्यांच्या बैलजोडीला हात लावत नांगरणी सुरू केली. हा अनोखा क्षण पाहून उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला.
“काड्या मातीत, मातीत तिफण चालते…” हे गाणं या दृश्यासोबत अगदी सजीव झालं. एकीकडे राजकीय व्यस्तता असतानाही वानखडे यांचा मातीशी असलेला नाळ अजूनही मजबूत असल्याचं हे दृश्य पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगरणी, साफसफाई आणि पेरणीपूर्व तयारी सुरू केली आहे. आता केवळ पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी मृग नक्षत्राच्या प्रारंभानंतर पेरणीला सुरूवात करत आहेत. अशा वेळी एक लोकप्रतिनिधी स्वतः शेतात उतरतो हे चित्र शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करणारे आहे.
प्रतिनिधी नितेश किलेदार



