अचलपूर कृषी बाजार समितीत भरदिवसा लाखोंची चोरी! सीसीटीव्हीत चोरटा कैद

परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (१९ जून) दुपारी ३ वाजताच्या सुमारास भरदिवसा धक्कादायक चोरीची घटना घडली. शेतकऱ्यांना चुकारा देण्यासाठी बँकेतून आणलेले ४ लाख ८० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले असून, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
घडलेली घटना नेमकी काय?
नेहमीप्रमाणे बाजार भरत असल्याने कृषी बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी गर्दी होती. याच दरम्यान, बंडू बंसगोपाल अग्रवाल या व्यापाऱ्याने ‘श्री जय अंबे ट्रेडर्स’ या प्रतिष्ठानात शेतकऱ्यांना देण्यासाठी बँकेतून मोठी रक्कम आणली होती. ही रोकड एका लाकडी गल्ल्याच्या पेटीत ठेवण्यात आली होती.
अग्रवाल काही क्षणांसाठी बाहेर गेले असताना, नेमकी ही वेळ साधून एक अज्ञात चोरटा दुकानात घुसला आणि ती पेटी उचलून बाहेर ठेवलेल्या दुचाकीवरून पसार झाला. या कारवाईत चोरट्याचा एक साथीदार गेटबाहेर दुचाकीवर लक्ष ठेवून होता.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
घटनास्थळाजवळ असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा स्पष्टपणे कैद झाला आहे. परतवाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या मागावर जाण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
व्यापाऱ्यांत आणि शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
भरदिवसाचा वेळ आणि बाजार समितीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी एवढी मोठी चोरी घडल्याने व्यापारी आणि शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता आणि भीती पसरली आहे. या घटनेने बाजार समितीतील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विशेष म्हणजे, चोरी करून चोरटे जेव्हा अचलपूर गेट मार्गे बाहेर पडले, त्याच वेळी बाजार समितीचे कर्मचारी गेटवर तैनात होते, तरीही ही घटना घडली. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनावर टीका होत आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी
या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. “दिवसा ढवळ्या लाखोंची चोरी होणे म्हणजे सुरक्षेचा मोठा फज्जा उडाला आहे. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घ्यावी आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करावी,” अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
पोलिसांचा तपास सुरू
परतवाडा पोलीस स्टेशनचे तपास पथक सक्रिय झाले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित चोरट्यांचा मागोवा घेण्याचे आणि रोकड हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रतिनिधी : नितेश किल्लेदार



