AkolaLatest News

हिरपूरमध्ये नाल्यांची दुरवस्था; ग्रामस्थ संतप्त.

मुर्तिजापूर /अकोला : हिरपूर गावामध्ये पावसाळ्याची सुरुवात होत असूनही मुर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर ग्रामपंचायतीची नालेसफाईची कामे अद्याप सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गावातील मुख्य रस्त्यांपासून शाळा, अंगणवाडी आणि देवस्थान परिसरापर्यंत ठिकठिकाणी घाण पाण्याचा साच व दुर्गंधी यामुळे अस्वच्छतेचे वातावरण तयार झाले आहे.

रोजच्या जीवनावर परिणाम
घाण पाण्यामुळे लहान मुलं, महिला आणि वृद्धांना रोजच्या हालचालींसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, रोगराईच्या उद्रेकाची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; केवळ तोंडी तक्रारीच
ग्रामस्थांनी वेळोवेळी तोंडी तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत पदाधिकारी दररोज या रस्त्यांवरून जात असूनही प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप गावकऱ्यांनी केला.

लोकप्रतिनिधींवर रोष
“निवडणुकीच्या वेळी आश्वासनांची खैरात करणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर गावकऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित करतात,” असा स्पष्ट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीकडून गाव विकासासाठी कोणतेही नियोजन न करता फक्त बुडबुड्याचे आश्वासन दिले जात असल्याचे चित्र आहे.

प्राथमिक गरजांवरही दुर्लक्ष
गावातील मूलभूत गरजा जसे की – नालेसफाई, स्वच्छ पाणी, सार्वजनिक दिवाबत्ती, रस्ते दुरुस्ती या प्राथमिक प्रश्नांवर काम केले जात नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांची अपेक्षा
“गावाला स्मार्ट बनवा, अशी अपेक्षा नाही. पण किमान मूलभूत गरजा तरी पूर्ण करा,” असा साधा पण मार्मिक सवाल ग्रामस्थ विचारत आहेत

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button