अनैतिक संबंधातून भिक्षा मागणाऱ्या मित्राला कायमचे संपवले

नागपूर : नागपूर शहरातील मध्यवर्ती अग्रसेन चौकात ८ जूनच्या रात्री झालेल्या एका थरारक घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून एका भिक्षा मागणाऱ्या इसमाने आपल्या मित्राचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मृतकाचे नाव शैलेश उर्फ अण्णा हिरालाल (रा. भोपाल) असून, आरोपीचे नाव अनुराग उर्फ घोडा सुनील बोरकर असे आहे. ही घटना पंजाब हार्डवेअर जवळील अग्रसेन चौक परिसरात घडली.
जेलमध्ये झाली मैत्री, नागपूरमध्ये फुटपाथवर राहायचे
शैलेश व अनुराग यांची ओळख होशंगाबाद येथील कारागृहात झाली होती. शिक्षा संपल्यानंतर दोघेही नागपूरमध्ये आले आणि फुटपाथवरच राहत होते. आरोपी अनुराग एका महिलेसोबत पती-पत्नी म्हणून राहत होता. याच महिलेसोबत मृतक शैलेशचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीच्या मनात होता.
दगडाने डोक्यावर केले वार, घटनास्थळी रक्त सांडले
या रागातूनच ८ जूनच्या रात्री आरोपीने शैलेशवर झोपलेला असताना डोक्यावर दगडाने जबरदस्त प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शैलेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
घटनास्थळी गोंधळ, पोलिसांना मिळाली माहिती
हल्ल्याचे दृश्य आरोपीच्या मित्राने पाहिले आणि घटनेची माहिती स्थानिक मॅनेजर राकेश याला दिली. राकेशने तातडीने पोलिसांना फोन करून कळवले. तहसील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी अनुराग बोरकरला ताब्यात घेतले.



