हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत कौडण्यपूरच्या रुख्मिणी मातेची पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ

कौडण्यपूर : टाळ, मृदुंगाच्या गजरात, भक्तीच्या सागरात न्हालेला कौडण्यपूर आज एका ऐतिहासिक आणि भावनिक सोहळ्याचा साक्षीदार ठरला. महाराष्ट्रातील 431 वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीक्षेत्र कौडण्यपूर येथून माता रुख्मिणीची पालखी आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने साडीचोळी आणि ओटी भरून पालखीला विधीवत निरोप देण्यात आला. मंदिर परिसरातून निघाल्यानंतर गावात ठिकठिकाणी पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांच्या वतीने केलेल्या पूजन आणि आरतीमुळे परिसर भक्तिमय झाला होता.
पालखीच्या आगमनानंतर महिला भजन मंडळींनी फुगडीच्या तालावर भजनांनी सारा परिसर गाजवला. पुढे पालखी पाच पाऊली स्थळावर पोहोचताच अंबा रुक्मिणी महोत्सव समिती, रविराज देशमुख मित्रपरिवार व पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे उत्साहात स्वागत केले.
महाआरतीनंतर भाविकांनी डोळ्यांत अश्रू आणत “माहेरावरून लेक सासरी जाताना” हे हृदयस्पर्शी दृश्य अनुभवले. माता रुख्मिणीच्या पालखीला भावपूर्ण निरोप देताना वारकऱ्यांच्या मनात भक्तिभाव आणि विरहाची झलक स्पष्ट दिसून येत होती.
ही पालखी पंढरपूरला पोहोचेपर्यंत मार्गात विविध गावांमध्ये पूजन, भजन, कीर्तन व स्वागताचे कार्यक्रम पार पडणार आहेत.



