महाबीजकडून शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांचे वाटप; अर्जासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी आवश्यक

यवतमाळ : खरीप हंगाम 2025-26 ला सुरुवात होत असतानाच राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाबीज कंपनीकडून यावर्षी शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे बंधनकारक आहे.
मोफत वाटपासाठी ३,५२५ क्विंटल बियाण्यांचा साठा
महाबीज कंपनीकडून शेतकऱ्यांना ३,५२५ क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे मोफत वाटप केले जाणार असून, एका शेतकऱ्याला एक हेक्टर क्षेत्रासाठी तीन बॅग बियाणे दिले जाणार आहे. त्याशिवाय १०१२ क्विंटल बियाण्यांचे मोफत किटही खरीप हंगामात वितरित करण्यात येणार आहेत.
बाजारभावाच्या तुलनेत महाबीजचे बियाणे स्वस्त
महाबीज कंपनी यंदा १२,००० क्विंटल बियाण्यांचा साठा विक्रीसाठी बाजारात आणणार आहे. प्रति किलो फक्त ७३ रुपये दराने हे बियाणे वितरित होईल. त्याशिवाय ५ वर्षांआतील नवीन वाणांवर १००% अनुदान देण्यात येणार आहे.
तुरीच्या बियाण्यावरही मोठे अनुदान
तूर पिकासाठी १० वर्षांआतील वाणांवर ५० रुपये प्रति किलोचे अनुदान दिले जाईल. यामुळे १८० रुपये किलोचा दर असलेले बियाणे फक्त १३० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात दिलासा
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये अनेक शेतकरी अजूनही बँक कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे महाबीजकडून मोफत बियाण्याचे वाटप ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरणार आहे.



