AkolaLatest News

दारूच्या नशेत पीएसआयची डॉक्टरला शिवीगाळ? – व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी!

अकोला : आरोग्य आणि पोलिस प्रशासनाच्या समन्वयाला काळिमा फासणारी घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. दहीहंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कळसकर यांनी दहीहंडा पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रभुदास गंडलिंगे यांच्यावर दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या दोघांमधील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकार?
डॉ. सागर कळसकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पीएसआय गंडलिंगे यांनी “तू आरोग्य केंद्रात हजर का राहत नाहीस?” असा जाब विचारत वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करत, “एक्ट्रसिटीचा गुन्हा दाखल करतो” अशी धमकी दिल्याचा आरोपही डॉक्टरांनी केला आहे.

दारूच्या नशेत असल्याचा दावा
या प्रकरणात गंभीर बाब म्हणजे, पीएसआय गंडलिंगे हे त्या वेळी दारूच्या नशेत होते, असा दावा देखील डॉक्टरांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकारानंतर दहीहंडा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, डॉक्टरांनी या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, पोलीस यंत्रणेतील वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यातील वादाचे दृश्य पाहून सामान्य नागरिकही धक्का बसले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची
या प्रकारानंतर आता पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, आणि दोषीवर कारवाई होणार का?, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेमुळे आरोग्य सेवकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button