नागपुरात अल्पवयीन चोरांची टोळी, वाईन शॉप फोडून 1.39 लाखांचा मुद्देमाल चोरीस
नागपूर : वाडी येथील एस. के. वाईन शॉपचे मॅनेजर दिवसभराची विक्रीची रोकड ड्रॉवरमध्ये ठेवून दुकान बंद करून निघाले. परंतु 14 मे रोजी सकाळी 6:58 वाजता, दुकानमालकाने मॅनेजरला फोन करून सांगितलं की दुकानाचं शटर वाकलेलं असून, दरवाजा देखील तोडलेला आहे.
मॅनेजर घटनास्थळी पोहोचल्यावर ड्रॉवर फोडलेलं दिसलं आणि त्यातील रोकड व विविध ब्रँडची दारू असा एकूण ₹1,39,050 चा मुद्देमाल चोरीस गेल्याचं उघडकीस आलं.
वाडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासात धक्कादायक बाब म्हणजे या चोरीत अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं.
नागपूरमधील विकास नगर आणि महादेव नगर येथील पाच अल्पवयीन आरोपींची ओळख पटवण्यात आली. एकाला पालकांसमोर ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तसेच, सुजल ऊर्फ म्युनिसिपाल्टी ऊर्फ प्रदीप बागडे (वय 21, रा. दुग्धामना, नागपूर) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून रोख रक्कम व परदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे. आणखी दोन अल्पवयीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल धुरट करत आहेत. वाडी परिसरासह संपूर्ण नागपूरमध्ये रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून, पोलिसांनी सर्व दुकानदारांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.



