सिटी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट १२ तासात प्रशासनाची मोठी अतिक्रमण कारवाई
अमरावती : शहराच्या मध्यवर्ती आणि गर्दीच्या भागात असलेल्या राजापेठ उड्डाणपुलाच्या खाली गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध अतिक्रमण सुरू होतं. अतिक्रमणकारांनी चालत्या पदपथांपासून वाहन मार्गांपर्यंत जागा व्यापून टाकली होती. अस्थायी दुकानं, चहा आणि भेळ गाड्या, काही ठिकाणी तर फळ विक्रेते आणि अगदी ऑटोचालकांपर्यंत जिथे जागा मिळाली तिथे दुकानं लावली असं दृश्य पाहायला मिळत होतं.रेल्वेच्या अंडरपासजवळ टेम्पो, खासगी वाहने, रिक्षा चालक यांचा अड्डा बनला .भाडे वसुलीच्या चर्चा, अघोषित नेत्यांची दादागिरी, पोलिस आणि अतिक्रमण विभागाची अनास्था…
यावर १८ मे रोजी सिटी न्यूजने “राजापेठ उड्डाणपुलाखाली अतिक्रमण कोणाचं?” या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून वस्तुस्थिती समोर आणली. बातमी लागताच १२ तासातच प्रशासन हललं..
अमरावती शहरातील राजापेठ चौक हा सध्या उड्डाणपुलाखाली झालेल्या अवैध अतिक्रमणामुळे चर्चेत आहे. उड्डाणपुलाखाली पादचाऱ्यांसाठी असलेल्या जागेवर अस्थायी दुकानदारांनी आपलं दुकान थाटलं असून, नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय. सिटी न्यूजवर १८ मे रोजी प्रसारित झालेल्या विशेष रिपोर्टमध्ये हे वास्तव सविस्तर दाखविण्यात आलं.
बातमीत या अस्थायी दुकानदारांकडून काही लोक भाडं वसूल करत असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये असल्याचे सांगण्यात आले. “जिथे जागा मिळाली, तिथे दुकान थाटलं” असं या अतिक्रमणाचं जिवंत चित्रण सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालं.या अतिक्रमणामुळे केवळ पादचाऱ्यांनाच नव्हे, तर अंडरपासमधून जाणाऱ्या वाहनचालकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. ऑटोचालक आणि खासगी प्रवासी वाहनधारकांनी पुलाखाली आपली जागा पकडून ठेवली आहे. हा प्रकार दादागिरी आहे की पोलीस यंत्रणेची कमजोरी? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
अतिक्रमण विभागावर दबाव आहे का?
त्यांना कारवाई करण्यासाठी परवानगी नाही की ते ‘मलाई’ खात आहेत?
अशा चर्चा आता गल्लीबोळात सुरू आहेत. अमरावती पोलिसांच्या वाहतूक शाखेची निकामी कार्यक्षमता सुद्धा या रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आली.
प्रशासनाच्या चुका, वसुलीचे खेळ आणि काही स्वयंघोषित नेत्यांची दादागिरी यामुळे राजापेठसह संपूर्ण अमरावती शहर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे.
सिटी न्यूजवर रविवार १८ मे रोजी रात्री प्रसारित झालेल्या विशेष वृत्तानंतर, सकाळीच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत उड्डाणपुलाखालची दुकाने हटवली आणि ट्रकभर साहित्य जप्त केलं.परंतु खरा प्रश्न हा आहे की, या कारवाईचा प्रभाव किती दिवस टिकतो?
कारवाई झाली खरी, पण अतिक्रमण विभागाचा धाक आणि प्रशासनाची कडक भूमिका किती काळ दिसून येते, हे तर येणारी वेळच सांगेल.
राजापेठ उड्डाणपूल हे एकच उदाहरण नाही, तर संपूर्ण शहर अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. आणि याला जबाबदार आहे निष्क्रिय प्रशासन, जे आर्थिक फायद्यासाठी दुर्बल होत आहे आणि अशा अवैध कृत्यांना मूक पाठिंबा देत आहे. सोमवारी सकाळी अतिक्रमण विभागाने कारवाई तर केली, परंतु हा प्रश्न इथेच संपत नाही…
कारवाई झाली खरी, पण ती किती दिवस टिकते? अतिक्रमण हटवले जातात, पण पुन्हा पुन्हा उगम पावतात. कारण आहे निष्क्रिय प्रशासन, राजकीय हस्तक्षेप, आणि आर्थिक वसुलीची चैन.यात फक्त राजापेठच नाही, संपूर्ण अमरावती शहर अतिक्रमणाने पोखरले गेले आहे.
पदपथ, बसथांबे, शाळांच्या गेटजवळचे रस्ते, हॉस्पिटलजवळचे मार्ग, सर्वत्र अराजक.प्रशासनाला प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, अतिक्रमण हटवायचं की परवानगी द्यायची?



