शिरजगाव बंड येथे मंदिरामागील अतिक्रमण हटविण्यासाठी गावकऱ्यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

चांदूरबाजार : चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथील श्री संत मारुती महाराज आणि गाडगे महाराज मंदिरामागील जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करत ग्रामस्थांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. सात दिवस उलटूनही कोणतीही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
अतिक्रमणाचे गांभीर्य:
गावातील निलेश रमेश रावडे यांनी मंदिरामागील ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर तीन गाळ्यांचे बांधकाम करून मार्केटसाठी अतिक्रमण केल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. ही वादग्रस्त जागा शिरजगाव बंड (सर्वे क्र. २०२/१, २०२/२) व जमापूर (सर्वे क्र. १९) येथील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बनावट कागदपत्रांचा आरोप:
रावडे यांनी बोगस सातबारा बनवून १४५ क्रमांकाच्या भूखंडावर हक्क सांगितला आहे. गावकऱ्यांनी हा सातबारा बनावट असल्याचे सांगत संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी व निलंबनाची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत व प्रशासनावर गंभीर आरोप:
गावकऱ्यांनी अतिक्रमणाविरोधात सर्व कागदपत्रांसह ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली होती, तरीसुद्धा कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी जोरदार मागणी सुरू आहे. गटविकास अधिकारी, तहसीलदार, भूमि अभिलेख, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली:
अन्नत्याग उपोषण करणाऱ्या लक्ष्मण दाभणे, मनोहर निंबुरकर, राजेश कडू, बाबुराव रावणकर, नितीन मेहरे, अनिल डेहा, प्रभाकर रावडे, विनोद पागरुत, पवन भिडे, बाबुराव गुबरे व निर्भय रघुवंशी या नागरिकांची तब्येत खालावली आहे.
उपोषणकर्त्यांचा निर्धार:
“जोपर्यंत अतिक्रमण हटवले जात नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील,” असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
प्रशासनाची प्रतीक्षा:
सात दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कृती न झाल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे. प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



