विद्यापीठात कर्मचा-यांकरिता आरोग्यविषयक जनजागरण कार्यक्रम संपन्न
अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आरोग्य केंद्र व अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या शंभर दिवसपूर्ती निमित्त आरोग्यविषयक जनजागृती उपक्रमांतर्गत विद्यापीठातील कर्मचा-यांकरिता आरोग्यविषयक जनजागरण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यावेळी अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी विविध आजारांबाबत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रभारी कुलसचिव तथा नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. प्रिती लाहोरे, डॉ. मनिषा म्हस्के, डॉ. आशीष व-हेकर, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता थोरात यांची उपस्थिती होती.
ओरल हायजीनवर मार्गदर्शन करतांना डॉ. आशीष व-हेकर यांनी दांत कसे स्वच्छ ठेवावे, तोंडामध्ये फोड आल्यास तो सामान्य आहे की कॅन्सरचा याचे निदान कसे लावावे, गळ्यामध्ये आलेल्या गाठी, ब्राश कसा करावा, दाताची निगा कशी राखावी याविषयी सविस्तर माहिती दिली. मुख कॅन्सरचे विविध प्रकार स्लाईडच्या माध्यमातून दाखवून त्यासाठी घ्यावयाची दक्षता यावर मार्गदर्शन केले.
डॉ. प्रिती लाहोरे यांनी मार्गदर्शन करतांना लठ्ठपणा कसा ओळखायचा, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम, लठ्ठपणा कशामुळे होतो, त्यावर नियंत्रण कसे ठेवावे, अकारणच लठ्ठपणा झाल्यास काय केले पाहिजे, वैद्यकीय उपचार आदींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्न, शंकांचे योग्यशीर निरसनही केले. कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. मनिषा म्हस्के यांनी थॉयराईड आजाराबाबत सांगतांना आजाराची कारणे, लक्षणे, थॉयराईड ग्रंथी, आजाराचे निदान व उपचार आदींबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
ननसा संचालक डॉ. अजय लाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात यांनी आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विषद केली व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. संचालन व आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता समाजसेवी अधीक्षक श्री किशोर धर्माळे, श्री अजय वानखडे तसेच आरोग्य केंद्रातील सचिन बाळापुरे यांनी अथक परिश्रम घेतले.



