कळमना पोलीस स्टेशनचे रूपडे पालटले! आधी कसे होते आणि आता कसे आहे ? पहा संपूर्ण रिपोर्ट

नागपूर :- पोलीस ठाणे म्हणजे काय? धूळमाखलेले फर्निचर, जुन्या फाईलींचे ढीग, आणि नागरिकांना अस्वच्छ वातावरणात बसायला लागणारे कार्यालय? मात्र, नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याचा चेहरा आता पूर्ण बदलला आहे! पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या स्वच्छता आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत कळमना पोलीस स्टेशन आता झाले आहे एक आधुनिक आणि सुव्यवस्थित कार्यालय! संपूर्ण आधी आणि आता यामधील बदलांचा अहवाल पाहूया फक्त सिटी न्यूजवर!
कळमना पोलीस ठाणे पूर्वी कोणत्याही सामान्य पोलीस ठाण्याप्रमाणेच दिसत होते – धूळभरलेले कागदपत्रांचे गठ्ठे, मोडकळीस आलेल्या खुर्च्या, अस्ताव्यस्त कार्यालय आणि नागरिकांसाठी असुविधाजनक व्यवस्था! मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेअंतर्गत कळमना पोलीस स्टेशनमध्ये अभूतपूर्व बदल घडवले गेले!
पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात पहिली कारवाई झाली ती म्हणजे सर्व जुने आणि कालबाह्य रेकॉर्ड नष्ट करणे! दारूबंदी प्रकरणातील तब्बल ९२ गुन्ह्यांमधील मुद्देमाल आणि नॉयलॉन मांजाच्या २६० गुन्ह्यांतील मुद्देमाल यांना नष्ट करण्यात आले! पोलीस ठाण्याच्या भिंतींना नवीन रंगरंगोटी करण्यात आली, ज्यामुळे हे ठाणे पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसू लागले आहे! नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी आणि माहिती मिळावी यासाठी ७ प्रकारचे नवीन सूचना फलक बसविण्यात आले आहेत!
याशिवाय, जुन्या खुर्च्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून, पोलीस ठाण्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याची देखील योग्य व्यवस्था करण्यात आली आहे! कळमना पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी ‘CITY NEWS’ शी बोलताना सांगितले की, हा बदल नागरिकांसाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून, यामुळे ठाण्याचे वातावरण अधिक कार्यक्षम आणि सकारात्मक झाले आहे!
हा बदल फक्त कळमना पोलीस स्टेशनपुरता मर्यादित न राहता नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात होण्याची गरज आहे! नागरिकांना अधिक स्वच्छ आणि व्यवस्थित सेवा मिळावी यासाठी पोलिसांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. आपणही या बदलाबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा!



